Musician Death: भारतीय रॉक संगीतविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध रॉक बँड ‘इंडस क्रीड’चे ज्येष्ठ गिटारवादक आणि ‘रॉक मशीन’चे संस्थापक सदस्य महेश तिनाईकर यांचे वयाच्या ६३व्या वर्षी निधन झाले. १५ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय रॉक संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे.
महेश तिनाईकर हे भारतीय रॉक संगीताच्या सुरुवातीच्या काळातील महत्त्वाचे नाव होते. १९८४ मध्ये त्यांनी ‘रॉक मशीन’ या बँडची स्थापना केली. त्यानंतर या बँडचे नाव ‘इंडस क्रीड’ असे करण्यात आले. भारतीय रॉक संगीताला देशात मोठा प्रेक्षकवर्ग मिळवून देण्यात या बँडचा मोठा वाटा आहे. ‘रॉक मशीन’च्या काळात तिनाईकर यांनी आपल्या दमदार गिटारवादनाने संगीतप्रेमींच्या मनावर वेगळी छाप पाडली.
‘रॉक मशीन’चा पहिला अल्बम ‘Rock N Roll Renegade’ १९८८ मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर ‘The Second Coming’ हा अल्बम १९९० मध्ये आला. पुढे बँडने ‘इंडस क्रीड’ या नावाने नवी ओळख निर्माण केली. ‘Pretty Child’, ‘Trapped’ आणि ‘Fireflies’ यांसारख्या गाण्यांमुळे बँडला मोठी लोकप्रियता मिळाली. २०१२ मध्ये ‘Evolve’ या अल्बमद्वारे बँडने पुन्हा दमदार कमबॅक केला.महेश तिनाईकर यांनी इंडस क्रीडव्यतिरिक्त इतर कलाकारांसोबतही काम केले. त्यांनी गायक गॅरी लॉयर यांच्यासोबतही काम केले. मार्च २०२६ मध्ये इंडस क्रीडने मुंबईतील डिफ लेपर्डच्या कॉन्सर्टमध्येही परफॉर्म केले होते.
महेश तिनाईकर यांच्या निधनानंतर अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार फरहान अख्तरने सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. महेश तिनाईकर यांचा गिटार वाजवतानाचा फोटो शेअर करत फरहानने ‘RIP brother’ असे म्हणत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
गायक-संगीतकार विशाल ददलानी यांनीही महेश तिनाईकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांनी महेश तिनाईकर यांच्यासाठी खास फोटो पोस्ट केला. त्यांनी लिहिले, आज भारताने एक खरा 'दिग्गज' गमावला आहे. #RockMachine च्या काळापासून आजवरच्या प्रत्येक रॉक-अँड-रोल कलाकाराने महेश तिनाईकर यांचे ऋणी राहायला हवे. एक प्रेरणादायी संगीतकार आणि नेहमी योग्य बाजूने उभे राहणारे व्यक्तिमत्व. मला @induscreednow सोबत मंचावर येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.