Director Death: भारतीय साहित्य, चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात आपल्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ डोगरी लेखक, कवी, विचारवंत, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते वेद राही यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्यामुळे साहित्य आणि चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
वेद राही यांच्या पश्चात दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. जवाहर बाग स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी उर्दू, डोगरी आणि हिंदी भाषेत सातत्याने लेखन केले. साहित्य, चित्रपट आणि दूरदर्शन या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
वेद राही यांचा जन्म २२ मे १९३३ रोजी जम्मू येथे झाला. त्यांचे वडील मुल्क राज सराफ हे प्रसिद्ध पत्रकार होते. जम्मू-काश्मीरमधील 'रणबीर' या पहिल्या वृत्तपत्राचे ते संस्थापक होते. साहित्य आणि पत्रकारितेचा वारसा लाभलेल्या कुटुंबात वेद राही यांचे बालपण गेले. त्यांनी सुरुवातीला उर्दू भाषेतून लेखनाला सुरुवात केली. पुढे डोगरी आणि हिंदी भाषांमध्ये त्यांनी साहित्यनिर्मिती केली. 'काले हट्ठे', 'गर्भ जूण', 'आले', 'लाल देद' आणि 'हड बेडी ते पट्टन' या त्यांच्या साहित्यकृती विशेष गाजल्या. त्यांच्या 'आले' या कादंबरीला १९८३ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर १२ डिसेंबर २०२४ रोजी त्यांना साहित्य अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले होते.
साहित्याप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतही वेद राही यांनी मोठे योगदान दिले. त्यांनी जवळपास २५ चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवादलेखन केले. 'ये रात फिर ना आएगी', 'पवित्र पापी', 'आप आए बहार आई', 'बेईमान', 'संन्यासी', 'चरस' आणि 'बेजुबान' यांसारख्या चित्रपटांच्या लेखनात त्यांचा सहभाग होता. लेखनासोबतच त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. 'प्रेम पर्वत', 'काली घटा' आणि 'वीर सावरकर' यांसारखे चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे ठरले. याशिवाय दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका 'गुल गुलशन गुलफाम' मुळेही ते घराघरांत पोहोचले.
वेद राही यांना साहित्य अकादमी पुरस्कारासह महापंडित राहुल सांकृत्यायन पुरस्कार, कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार आणि जम्मू-काश्मीर सरकारचा जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने भारतीय साहित्य, चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील एका बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा प्रवास संपला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.