Badshah Controversy: बादशाहच्या अडचणीत वाढ; महिला आयोगाकडून अटकेची मागणी, कॉन्सर्टवर बंदी घालण्याचा इशारा
Badshah Controversy: रॅपर आणि गायक बादशाहच्या ‘टटीरी’ या गाण्यामुळे वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या प्रकरणात रेणू भाटिया यांच्या नेतृत्वाखाली हरियाणा राज्य महिला आयोगने कठोर भूमिका घेतली असून बादशाहला अटक करण्याची मागणी केली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी पानिपत आणि पंचकुला पोलिसांना याबाबत निर्देश दिल्याचे सांगितले आहे.
रेणू भाटिया यांनी स्पष्टपणे सांगितले की, या वादाच्या पार्श्वभूमीवर बादशाहला भारतात कुठेही कार्यक्रम किंवा कॉन्सर्ट करण्याची परवानगी देऊ नये. यासाठी राज्यातील संबंधित ठिकाणी नोटिस पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय बादशाह देशाबाहेर जाऊ नये म्हणून त्याचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणीही आयोगाने केली आहे.
या प्रकरणात महिला आयोगाने बादशाहला समन्स बजावून चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, तो आयोगासमोर हजर राहिला नाही. त्याऐवजी त्याचे वकील उपस्थित राहून बादशाह कामांमुळे येऊ शकत नसल्याचे सांगत आणखी वेळ मागितली. आयोगाने दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत दिली होती, तरीही बादशाह उपस्थित राहिला नाही. त्यामुळे आयोगाने नाराजी व्यक्त करत त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
महिला आयोगाच्या मते, ‘टटीरी’ या गाण्यातील काही शब्द आणि दृश्यांमुळे महिलांबाबत आक्षेपार्ह संदेश पसरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारणामुळे ६ मार्च रोजी बादशाहला नोटीस पाठवण्यात आली होती आणि त्याला पानिपतच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
दरम्यान, या वादानंतर पंचकुला पोलिसांनी १ मार्च २०२६ रोजी यूट्यूबवर प्रदर्शित झालेले हे गाणे काढून टाकण्याची कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. गाणे प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक सामाजिक संघटना आणि महिला संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला होता. या वादावर प्रतिक्रिया देताना बादशाहने व्हिडिओ पोस्ट करत म्हटले की, “माझ्या ‘टटीरी’ गाण्यातील काही शब्दांमुळे हरियाणातील काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर मला त्याबद्दल दु:ख आहे. मी स्वतः हरियाणाचा असल्याने मला माफ करावे.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
