Marathi Serial: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी सुरू झालेली ही मालिका 14 जून रोजी तिचा शेवटचा भाग प्रसारित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे मालिकेच्या चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. मालिकेतील प्रमुख अभिनेता आणि निर्माते डॉ. अमोल कोल्हे यांनीही याबाबत खंत व्यक्त केली आहे.
सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली होती. शिक्षण, समाजसुधारणा, स्त्रीशिक्षण आणि अंधश्रद्धाविरोधातील संघर्ष या विषयांना मालिकेत उत्तमप्रकारे मांडण्यात आले होते. मात्र, आता ही मालिका केवळ 152 भागांमध्येच संपणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मालिकेच्या समाप्तीबाबत बोलताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, “शिक्षण हेच खरे सामर्थ्य हा विचार समाजात रुजवण्यासाठी सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांनी मोठा संघर्ष केला. प्रेक्षकांनी या मालिकेतून त्यांच्या आयुष्याचा प्रवास पाहिला. पण खऱ्या अर्थाने त्यांची कथा जिथून सुरू होते, त्याच टप्प्यावर मालिका संपत आहे. त्यामुळे ही मालिका 152 भागांमध्ये संपतेय, हे दुर्दैवी आहे.”
याचसह, त्यांनी चाहत्यांना आश्वस्त करत महत्त्वाचा संकेत देत पुढे म्हणाले, “ही मालिका संपत असली तरी फुले दाम्पत्याची गोष्ट इथेच थांबणार नाही. ती एका नव्या माध्यमातून आणि नव्या रूपात पुन्हा प्रेक्षकांसमोर येईल,” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या कथेला भविष्यात दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर किंवा नव्या रूपात पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, स्टार प्रवाहवर आगामी काळातील आठ नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे काही जुन्या मालिकांना निरोप द्यावा लागत असून, त्यामध्ये ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेचाही समावेश झाला आहे. 15 जूनपासून सायंकाळी 7.30 वाजता नवीन मालिका ‘सुना येती घरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.