साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) सध्या तिच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या 'अॅनिमल' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. पण काही दिवसांपूर्वी रश्मिक मंदान्ना चिंतेत होती त्यामागचे कारण म्हणजे तिचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. रश्मिकाच्या डीपफेक व्हिडीओवरून (Rashmika Mandanna Deep Fake Case) मोठा वाद निर्माण झाला होता. या व्हिडीओवर रश्मिकाचे चाहते आणि सेलिब्रिटींनी नाराजी व्यक्त करत आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. दिल्ली पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत होते. याप्रकरणी पोलिसांना (Delhi Police) आरोपींना अटक करण्यात यश आले आहे.
रश्मिका मंदान्ना डीपफेक व्हिडीओ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. याप्रकरणी पोलिस आरोपींचा शोध घेत होते. अखेर त्यांना चार संशयित आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. तर एका आरोपीचा पोलिस शोध घेत आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणातील चार संशयितांचा शोध घेण्यात आला आहे. हे चारही संशयित या व्हिडिओचे निर्माते नसून ते अपलोडर आहेत. अशा परिस्थितीत सध्या पोलिस या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये लिफ्टमध्ये येणारी एक महिला दिसत होती. एआयच्या मदतीने या व्हिडीओतील महिलेच्या चेहऱ्याला रश्मिका मंदान्नाचा चेहरा लावून व्हिडीओ तयार करण्यात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समोर आले होते की व्हिडीओमध्ये रश्मिका मंदान्ना नसून दुसरीच महिला आहे. त्यानंतर खरी महिला समोर आली होती. या व्हिडीओतील महिला ही ब्रिटिश भारतीय महिला झारा पटेल होती. तिने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत या व्हिडीओ प्रकरणी नाराजी व्यक्त केली होती.
डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रश्मिका मंदान्नाने सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली होती. तिने ही घटना अत्यंत भयानक असल्याचे म्हटले होते. तिने या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, 'खरे सांगायचे तर हा प्रकार केवळ माझ्यासाठीच नाही तर आपल्या प्रत्येकासाठी खूप भीतीदायक आहे. तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे आज सर्वांचेच मोठे नुकसान झाले आहे.' रश्मिकाच्या डीप फेक व्हिडिओनंतर, बॉलिवूडचे महानायक यांनी याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अमिताभ बच्चन यांनी रश्मिकासोबत 'गुडबाय' चित्रपटात काम केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.