Shiv Thackeray: टीव्हीनंतर आता मोठ्या पडद्यावर शिव ठाकरेची एंट्री; 'रक्तनीती'मधून करणार मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री

Shiv Thackeray: टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा शिव ठाकरे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ‘रक्तनीती’ या चित्रपटातून तो मोठ्या पडद्यावर दिसणार असून चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
Shiv Thackeray
Shiv ThackeraySaam Tv
Published On

Shiv Thackeray: टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आणि ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’, ‘झलक दिखला जा’ यांसारख्या रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेला शिव ठाकरे आता मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. मूळचा अमरावतीचा असलेल्या शिवने आपल्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली. आता तो मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असून त्याच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘रक्तनीती’ या मराठी चित्रपटातून शिव ठाकरे अभिनयाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.

‘रक्तनीती’ हा शिव ठाकरेचा पहिला मराठी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रदीप खैरवार आणि शेफाली सिंग राजपूत करणार आहेत. तर प्रशांत पांडे यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. प्रदीप खैरवार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माते-दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी राम गोपाल वर्मा यांच्या ‘रक्त चरित्र’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. शिवने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना या चित्रपटाची माहिती दिली.

Shiv Thackeray
Swara Bhasker: 'मी राणी पद्मावतीला भित्री म्हटलं नाही...'; त्या प्रकरणावरून ट्रोल झालेल्या स्वरा भास्करचे स्पष्टीकरण

चित्रपटाच्या घोषणेपूर्वी शिव ठाकरेने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. आपल्या चित्रपट पदार्पणाबद्दल बोलताना शिव म्हणाला, हा क्षण माझ्यासाठी अत्यंत आनंदादायी आहे. एका छोट्या शहरातून आलेल्या तरुणाने पाहिलेले स्वप्न मुंबईत पूर्ण होण्यासाठी तब्बल वीस वर्षे लागली असे तो म्हणाला. चित्रपटाविषयी सांगताना म्हणाला, ‘रक्तनीती’ हा एका सामान्य माणसाची कथा सांगणारा चित्रपट आहे. एखाद्या साध्या माणसाच्या वाट्याला अन्याय आला, त्याच्याशी कोणी वाकडे वागले, तर तो त्याला कसा सामोरा जाऊ शकतो, हे चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे.

Shiv Thackeray
Jayanti 2: कॉलेजमधील रॅगिंग, जातीभेदाचा थरार उलगडणार; 'जयंती २'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

शिव ठाकरेचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास सोपा नव्हता. प्रसिद्धी मिळण्यापूर्वी त्याने अमरावतीमध्ये वृत्तपत्र विकण्यापासून ते घरोघरी जाऊन दुधाच्या पिशव्या विकण्यापर्यंत विविध कामे केली. डान्स आणि अभिनयाची आवड असल्याने त्याने डान्स क्लासेसही सुरू केले. या सर्व कामांमधून मिळणारे पैसे तो आपल्या आईला देत असे. कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते, या विचाराने शिवने मेहनत सुरू ठेवली.

दरम्यान, शिव ठाकरेचे इन्स्टाग्रामवर २.४ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. टेलिव्हिजनवरील लोकप्रियतेनंतर आता तो मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com