Sameer Choughule: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुले सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकतीच त्यांची राज ठाकरे यांच्यासोबत भेट झाली असून, या भेटीचा अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
समीर चौघुलेने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर राज ठाकरे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत ही भेट ‘एक सहजसुंदर अनुभव’ असल्याचे सांगितले. त्यांच्या ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ या एकपात्री कार्यक्रमाचे १०० प्रयोग पूर्ण झाल्यानंतर त्यांना अनेकांकडून शुभेच्छा मिळाल्या; मात्र राज ठाकरे यांचा फोन त्यांच्या साठी सर्वात खास ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
समीरने पोस्टमध्ये लिहिले की, “सम्या सम्या मैफिलीत माझ्या” या माझ्या एकपात्री कार्यक्रमाचे १०० प्रयोग झाल्याबद्दल अभिनंदनाचे अनेक फोन आले. पण एक कॉल खूपच अनपेक्षित आणि खास होता. तो होता अत्यंत दिलखुलास, दर्दी, कलासक्त नेते. माननीय राजसाहेब ठाकरे यांचा - “दादरलाच आहात मग घरी येऊन जा” आणि मग झाली एका राजामाणसाबरोबर एक सहजसुंदर भेट, भरपूर गप्पा आणि हास्यजत्रेवरील प्रेम आणि हो मी निघताना १०० प्रयोग झाल्याबद्दल मला आणि माझ्या सहचारिणीला दिलेली सुंदर भेटवस्तू मनापासून आभार साहेब
“एका राजा माणसाबरोबरची सहजसुंदर भेट” अशा शब्दांत समीर चौघुले यांनी या भेटीचे वर्णन करत राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. समीर चौघुले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमुळे घराघरात पोहोचला आहे. त्याने अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमध्येही काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या विनोदी शैलीमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली आहे. दरम्यान, या भेटीमुळे समीर चौघुलेची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.