Phulwra Movie: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘फुलवरा’ या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. आता या चित्रपटातील दोन महत्त्वाच्या अभिनेत्रींचा पहिला लूक समोर आला आहे. अभिनेत्री वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांचा अस्सल मराठमोळा लावणीसाज नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून पाहायला मिळाला आहे. वैदेही मथुरा परितेकर, तर प्रियदर्शिनी संगीता परितेकर ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
वैदेही आणि प्रियदर्शिनी यांचा हटके अंदाज
‘फुलवरा’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पारंपरिक लावणी कलेचा आणि तमाशा संस्कृतीचा वारसा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील वैदेही आणि प्रियदर्शिनी यांच्या व्यक्तिरेखांबद्दल आतापर्यंत गुप्त ठेवण्यात आले होती. मात्र, आता त्यांचा पहिला लूक समोर आल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. दोन्ही अभिनेत्रींचा पारंपरिक लावणीचा साज आणि त्यांचा मराठमोळा अंदाज लक्ष वेधून घेत आहे.
‘नटरंग’नंतर १६ वर्षांनी रवी जाधव यांची नवी कलाकृती
दिग्दर्शक रवी जाधव आणि झी स्टुडिओज ही जोडी तब्बल १६ वर्षांनंतर पुन्हा एकदा तमाशा आणि लावणीच्या विश्वात घेऊन येत आहे. यापूर्वी त्यांच्या ‘नटरंग’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप पाडली होती. आता ‘फुलवरा’मधून लावणीचा पारंपरिक बाज, कलावंतांचे आयुष्य आणि या कलेसाठी त्यांनी घेतलेला संघर्ष उलगडणार आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांनी सांगितले की, लावणी ही महाराष्ट्राची ओळख आणि अभिमान असलेली लोककला आहे. या चित्रपटातील दोन्ही अभिनेत्रींचा पहिला लूक समोर आणणे हा त्यांच्यासाठी खास क्षण आहे. हा केवळ कलाकारांचा लूक नसून महाराष्ट्राच्या कलेला आणि तिचा वारसा जपणाऱ्या कलावंतांना दिलेली मानवंदना आहे.
भूमिकेसाठी वैदेही आणि प्रियदर्शिनीने घेतली मेहनत
वैदेही परशुरामीने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले की, लावणी ही केवळ नृत्यशैली नसून तिच्या प्रत्येक अदाकारीमागे एक वेगळे भावविश्व आणि ताकद असते. मथुरा परितेकर ही भूमिका साकारताना तिला लावणीचा बारकाईने अभ्यास करण्याची आणि स्वतःला नव्याने घडवण्याची संधी मिळाली. तर तर प्रियदर्शिनी इंदलकर म्हणते, “एखाद्या भूमिकेचा पहिला लूक प्रेक्षकांसमोर येतो, तेव्हा कलाकारासाठी तो क्षण नेहमीच खास असतो. ‘फुलवरा’च्या बाबतीत हा अनुभव अधिकच अविस्मरणीय आहे. कारण हा केवळ माझ्या व्यक्तिरेखेचा चेहरा समोर येण्याचा क्षण नसून, एका समृद्ध लोककलेच्या परंपरेशी जोडल्या गेलेल्या प्रवासाची सुरुवात आहे. लावणीच्या विश्वात प्रवेश करताना तिचा डौल, तिच्यातील नजाकत आणि त्यामागची मेहनत जवळून अनुभवता आली. प्रेक्षकांनी आजवर माझ्या कामाला दिलेलं प्रेम लक्षात घेता, माझं हे नवं रूप त्यांच्यासाठी एक सुखद धक्का ठरेल, अशी आशा आहे.’’
१४ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहात येणार ‘फुलवरा’
झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित ‘फुलवरा’ हा चित्रपट १४ जानेवारी २०२७ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. लावणीचा ठसका, तमाशाच्या फडातील रंगत आणि मराठी संस्कृतीचा अभिमान यांचा संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आता या चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार आणि त्यांची भूमिका काय असणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.