Rmayana Review: भारतीय संस्कृती आणि श्रद्धेचा महत्त्वाचा भाग असलेली 'रामायण' ही कथा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माता नमित मल्होत्रा यांनी 'रामायण' या चित्रपटातून ही महाकथा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रेक्षकांसमोर आणली आहे. त्रेतायुगातील रामायणाची कथा आणि आजच्या काळातील अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्स यांचा सुंदर मेळ या चित्रपटात पाहायला मिळतो. रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, रवी दुबे आणि रकुल प्रीत सिंह यांसारख्या कलाकारांच्या भूमिका या चित्रपटाचे आकर्षण ठरत आहेत.
रामायणाची कथा यापूर्वी अनेकदा चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांनी पाहिली आहे. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेला आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान आहे. मात्र, यावेळी नितेश तिवारी यांनी ही कथा मोठ्या पडद्यावर वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भव्य सेट, युद्धाचे प्रसंग, दमदार पार्श्वसंगीत आणि कलाकारांचा अभिनय यामुळे चित्रपट पाहताना भव्य अनुभव येतो.
चित्रपटाची सुरुवात देव आणि असुर यांच्यातील युद्धाने होते. देवांच्या विजयामुळे लंकेवर त्यांचे वर्चस्व निर्माण होते. त्यानंतर रावणाची आई कैकसी त्याला लंकेवर विजय मिळवण्याचे ध्येय देते. आईच्या सांगण्यावरून रावण कठोर तपश्चर्या करतो. त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेव त्याला वरदान देतात. त्यानंतर रावण लंकेत प्रवेश करून कुबेराची लंका आपल्या ताब्यात घेतो आणि आपले साम्राज्य निर्माण करतो. दुसरीकडे अयोध्येत राजा दशरथ यांच्या घरी राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म होतो. पुढे गुरु विश्वामित्र राजा दशरथ यांच्याकडे रामाला घेऊन जाण्याची विनंती करतात. कारण ताडका आणि सुबाहू यांसारखे राक्षस त्यांच्या यज्ञात अडथळे निर्माण करत असतात. राम या राक्षसांचा वध करून यज्ञाचे रक्षण करतात. यानंतर सीता स्वयंवर, राम-सीता विवाह आणि रामाचा वनवास असे प्रसंग दाखवण्यात आले आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागात रामाच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या घटनांवर भर देण्यात आला आहे. पुढे शूर्पणखा रामाला विवाहाची मागणी घालते. मात्र, लक्ष्मण तिचे नाक कापतात. त्यानंतर सीताहरण, रावण आणि जटायू यांच्यातील युद्धही पाहायला मिळते. यासह चित्रपटात काही सस्पेन्स पहायला मिळतात.
'रामायण'ची कथा सर्वांना माहीत असल्यामुळे ती नव्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडणे हे दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्यासमोर मोठे आव्हान होते. त्यांनी पौराणिक कथा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. अयोध्येचा राजेशाही थाट, दंडकारण्यातील घनदाट जंगल आणि सोन्याची लंका हे प्रसंग मोठ्या भव्यतेने दाखवण्यात आले आहेत. प्रत्येक प्रसंगात सेट आणि व्हिज्युअल इफेक्ट्सवर विशेष मेहनत घेतल्याचे जाणवते. चित्रपटातील युद्धाचे प्रसंगही लक्ष वेधून घेतात.
चित्रपटात रणबीर कपूरने प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली आहे. त्याच्या चेहऱ्यावरील शांत भाव, संयम आणि सौम्य स्वभाव यामुळे रामाची व्यक्तिरेखा प्रभावी वाटते. युद्धाच्या प्रसंगांमध्ये त्याचा वेगळा अंदाज पाहायला मिळतो. पण, कुठेतरी रामाच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य कमी असल्यासारखं चित्रपटात जाणवतं. मात्र, रावणाच्या भूमिकेतील यशने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. रावणाचा अहंकार, ताकद आणि त्याचा रुबाब यशने प्रभावीपणे साकारला आहे. पडद्यावर त्याच्यावरच प्रेक्षकांची नजर खिळून राहिलं अशा प्रकारे त्याने भूमिका साकारली आहे. विशेषतः रावणाच्या दशानन रूपातील प्रसंग विशेष लक्षवेधी ठरतो. हिंदीमध्ये रावणाच्या भूमिकेला शरद केळकर यांनी आवाज दिला आहे.
सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसत आहे. तिचा साधेपणा, चेहऱ्यावरील भाव आणि अभिनय प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. सीतेच्या त्यागाची आणि धैर्याची बाजू तिने चांगल्या प्रकारे साकारली आहे. तर लक्ष्मणाच्या भूमिकेत रवी दुबे दिसतो. भावासाठी असलेले प्रेम, त्याची निष्ठा आणि रागीट स्वभाव त्याने अभिनयातून दाखवला आहे. काही प्रसंगांमधील त्याचे संवाद लक्षवेधी आहेत. रकुल प्रीत सिंहने शूर्पणखेची भूमिका साकारली आहे. तिचा राजेशाही लूक आणि वेशभूषा या भूमिकेला शोभून दिसते. याशिवाय राजा दशरथ यांच्या भूमिकेत अरुण गोविल, कैकयीच्या भूमिकेत लारा दत्ता, मंदोदरीच्या भूमिकेत काजल अग्रवाल आणि विश्वामित्रांच्या भूमिकेत अजिंक्य देव दिसतात. अनुपम खेर यांनी जटायूची भूमिका साकारली असून त्यांच्या अभिनयातील भावनिक बाजू विशेष लक्ष वेधून घेते.
या चित्रपटातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे व्हिज्युअल इफेक्ट्स. युद्धाचे प्रसंग, रथ, शस्त्रे आणि लंका व अयोध्येचे दृश्य भव्य रुपात दाखवण्यात आले आहे. जंगलातील दृश्ये आणि जटायू-रावण यांच्यातील युद्धही लक्षवेधी आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीतही प्रसंगानुसार बदलते. शांत प्रसंगांमध्ये भक्तीभाव जाणवतो, तर युद्धाच्या वेळी पार्श्वसंगीतमुळे थरार वाढतो. हंस झिमर आणि ए. आर. रहमान यांनी संगीतावर काम केल्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा मोठ्या होत्या.
चित्रपटात काही प्रसंगांना अधिक वेळ देता आला असता, असे जाणवते. राम आणि माता कौशल्या यांच्यातील भावनिक प्रसंग अधिक विस्ताराने दाखवता आले असते. रणबीरचे आणखी एक्सप्रेशन आणि भगवान रामाचे सौम्य स्मित हास्य कमी पडल्या सारखे जाणवले. तीन तासांच्या चित्रपटात संपूर्ण रामायणाची कथा मांडताना काही महत्त्वाच्या घटनांना कमी वेळ देण्यात आला आहे. सहाय्यक कलाकारांच्या काही भूमिकांनाही अधिक वाव देता आला असता.
एकूणच, 'रामायणम्' हा केवळ पौराणिक कथा सांगणारा चित्रपट नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि आधुनिक सिनेमॅटिक तंत्रज्ञान यांचा संगम दाखवण्याचा प्रयत्न आहे. रणबीर कपूरचा शांत श्रीराम, यशचा अहंकारी रावण, साई पल्लवीची समजूदार शूर सीता आणि भव्य युद्धाचे प्रसंग ही चित्रपटाची प्रमुख आकर्षणे आहेत. काही प्रसंग घाईत उरकल्यासारखे वाटत असले, तरी मोठ्या पडद्यावर रामायणाची भव्यता अनुभवण्याची संधी या चित्रपटातून मिळते. त्यामुळे रामायणाची कथा, पौराणिक चित्रपट आणि भव्य व्हिज्युअल्स आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट विशेष ठरू शकतो. त्यामुळे हे भव्य स्वरुप अनुभवण्यासाठी एकदा तरी या चित्रपटाचा थिएटरमध्ये अनुभव घ्यायला हरकत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.