

भारतीय चित्रपटसृष्टीत २५ वर्षांचा सुवर्णकाळ गाजवणारे, ७२ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती करणारे आणि १२ राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग आता ‘लाडू’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमच मराठी दिग्दर्शनात पाऊल ठेवत आहेत. हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीत अनेक दिग्दर्शनाचे अनुभव गाठीशी असणारे शैलेंद्र सिंग यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बॉस एंटरटेनमेंट' आणि 'ब्रेडविनर प्रोडक्शन्स' ची प्रस्तुती असणारा हा चित्रपट सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये प्रचंड गाजत आहे.
‘पेज ३’, ‘कांचीवरम’, ‘हनुमान’, ‘कॉर्पोरेट’ आणि ‘डोर’ यांसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या चित्रपटांची निर्मिती शैलेंद्र सिंग यांनी केली. तसेच पहिली पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील कलाकृती भारतात प्रदर्शित करणारे शैलेंद्र सिंग यांनी केली आहे. आपल्या या पहिल्या मराठी दिग्दर्शकीय प्रवासाविषयी म्हणतात, "मी ७२ चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि यापूर्वी काही चित्रपट दिग्दर्शितही केले आहेत, पण दिग्दर्शक म्हणून मी केलेला हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ राहील आणि तो माझ्यासोबत कायम राहील. प्रदीप गोगटे यांच्या अभिनयाबद्दल बोलताना ते म्हणाले की त्यांचा अभिनय खरोखरच विलक्षण आहेत - ते आपल्या निःशब्द अभिनयातून एका माणसाचं संपूर्ण आयुष्य या पडद्यावर उभं करतात."
या चित्रपटाची निर्मिती 'बॉस एंटरटेनमेंट' आणि 'ब्रेडविनर प्रोडक्शन्स' सह-निर्माती सोनिया नासेरी कोल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे आणि कर्जतच्या मातीवर कृष्ण-धवल स्वरूपात चित्रित झालेला हा १०४ मिनिटांचा मराठी चित्रपट मानवी संघर्षाची अत्यंत भावनिक आणि वास्तवावादी गाथा मांडतो. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पाठवला जात आहे.
‘लाडू’ चित्रपटात ९ अस्सल मराठी गाणी आहेत, जी चित्रपटाच्या भावनिक प्रवासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. लवकरच या गाण्यांचा लॉन्च सोहळा देखील होणार आहे.