गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने नावाबद्दल एक मोठा निर्णय घेतला होता. शासकीय कागदपत्रांवर आपलं नाव त्यानंतर आईचं नाव, वडिलांचं नाव आणि शेवटी आडनाव असा क्रम नोंदविण्याचं बंधनकारक करणारा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. हा निर्णय १ मे २०२४ पासून लागू करण्यात येणार आहे.
१ मे रोजी आणि त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद आता अशा पद्धतीनेच केली जाणार आहे. त्यात आईचं नाव बंधनकारक असेल. महिला व बालविकास विभागाच्या वतीने हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या निर्णयासंबंधित मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे.
प्राजक्ता माळी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री, होस्ट आणि बिझनेसवुमन अशी ओळख असलेली प्राजक्ता कायमच इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह असते. अभिनेत्री कायमच चाहत्यांसोबत स्टायलिश अंदाजातील फोटो, वेगवेगळे रिल्स सोबतच तिच्या ज्वेलरी ब्रँडबद्दल महत्वाची माहितीही ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतंच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिलेली आहे. त्यामध्ये तिने तिच्या आईचं नाव जोडत स्वत:चं पूर्ण नाव लिहिलं आहे. यावेळी तिने महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांचे आभार मानले आहेत.
प्राजक्ता आपल्या पोस्टमध्ये म्हणते,
“#latepost नमस्कार मी प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी, काय झालं, अहो हो हो बरोबर नांव ऐकलं तुम्ही, आता आपल्या नावानंतर आपल्या आईचं नाव लावणंही अनिवार्य आहे. अहो हे मी नाही आपलं सरकार बोलत आहे. आपल्या आयुष्यात वडिलांचं नाव महत्वाचं आहे, तितकंच आईचं नाव देखील महत्वाचं आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास मंत्री “अदिती वरदा सुनील तटकरे” ताई यांनी. आता यापुढे सर्व शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावणं गरजेचं आहे. तर आहे ना अभिमानाची गोष्ट.....”
पोस्टच्या शेवटी प्राजक्ताने महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांचे आभार मानले आहेत. (Instagram)
प्राजक्ताने ही पोस्ट शेअर केल्यावर अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींना हा निर्णय आवडला नसल्याचे म्हटले. तर काहींनी ‘मुलीच्या लग्नानंतर तिने कसं नाव लावायचं?’ असा प्रश्न पोस्टवर एका युजरने विचारलाय. तर काहींनी ‘हे उगाच आता किती प्रोग्रेसिव्ह दाखवणार नाटक’, ‘नसती उठाठेव.. स्टंटवाले निर्णय घ्यायचे आणि हवा करायची. प्रत्येकाची आई प्रत्येकाला प्रिय असते. त्यासाठी हे असले उपक्रम कशाला, नावासाठी फक्त?,’ अशा शब्दांत ट्रोल केलं आहे. राज्य सरकारच्या ह्या निर्णयानंतर अनेक सेलिब्रिटींनी आपल्या नावानंतर आईचं नाव लिहिलेलं आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.