ज्ञानेश्वर चौतमल, पुणे
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Marathi Director Nitin Desai ) यांनी आत्महत्या केली आहे. कर्जतच्या एन.डी स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास लावून आत्महत्या (Nitin Desai Death Case) केली. त्यांच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडसह मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
नितीन देसाई यांचा "ट्रकभर स्वप्न" काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत काम केलेला मराठमोळा अभिनेता प्रवीण तरडेंना नितीन देसाई यांच्या अचानक एक्झिटमुळे खूप मोठा धक्का बसला. साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रवीण तरडे यांनी भावुक होत नितीन देसाई यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
प्रवीण तरडेंनी सांगितले की, 'आम्हाला हा धक्का आहे. एनडी असं करणं शक्य नाही. एनडीचा स्वभाव, एनडीची आक्रमकता, एनडीची भव्य स्वप्न हे सर्व पाहता ही बातमी खूपच शॉकिंग आहे. जे नितीन देसाईंना जवळून ओळखतात त्या कोणत्याच माणसाला या बातमीवर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे की एनडी अशापद्धतीने गेले. दोन आठवड्यांपूर्वी मी माझ्या नवीन सिनेमाच्या सेट आणि लोकेशनसंदर्भात एनडीची भेट घेतली. मी, महेश लिमये आणि माझी बायको आम्ही सगळेच गेलो होतो. काय ती एनर्जी काय ते बोलणं. दरवेळी ते लहान मुलासारखं अख्खा स्टुडिओ दाखवायचे.'
'आमचे संबंध तर २१ -२२ वर्षे जुने आहेत. खूप काम केलं आहे त्यांच्यासोबत. मी असिस्टंट होतो अमोल पालेकरांचा. अनाहत चित्रपट आम्ही सोबत केला होता. स्वत: प्रत्येक गोष्टीत लक्ष घालून ते काम करायचे. मनासारखा सेट झाला नाही तर त्यांची खूप चिडचिड व्हायची. त्यांना प्रत्येक गोष्ट मनासारखी लागायची. खूप कमी माणसं असतात जे जीव तोडून प्रोजेक्टसाठी काम करतात. बाजीराव मस्तानी सिरिअलसाठी मी त्यांच्यासोबत काम केलं होतं.'
'त्यांची खूप इच्छा होती की प्रविण तू माझ्यासाठी काही तरी लिहावं. त्यांनी प्रोड्यूस केलेला 'ट्रकभर स्वप्न' हा सिनेमा येऊन गेला. तो सिनेमा मी लिहिला. शक्यतो मी असं लिहित नाही. मी तीच गोष्ट लिहितो जी मी डिरेक्ट करतो. पण पहिल्यांदा असं झालं होतं की दादांसाठी मी केलं. एकत्रित केलेलं आमचं ते शेवटचं काम. आता मी एका नव्या सिनेमावर काम करत आहे. जे जुना शनिवार वाडा, पेशवाई, पेशव्याचा हॉल अशा गोष्टी लागत होत्या. पण परवडत नाही. मराठी सिनेमांचा बजेट नसतो. तर मी म्हणालो दादा कसं परवडणार हे सगळं? तर म्हणाले होते की, मी कुठे विचारले होते की पैसे किती. तुझं बजेट जेवढं आहे तेवढं पैसे दे. पैसे वैगरे नको रे, बोलत जाऊ प्रविण असं ते म्हणायचे.
मुळशी पॅटर्नबद्दल खूप वेळा बोलले. आवडता सिनेमा होता त्यांचा तो. तुझ्या या सिनेमाची खूप ताकद आहे असं ते म्हणायचे. करु करु एकत्र काम करु असे ते नेहमी बोलायचे. पण नितीन देसाई आपल्या बजेटच्या आवाक्याबाहेर असायचे. पण माझ्या सिनेमाच्यावेळी तुझ्याकडे किती पैसे आहे दे आपण करु असे ते म्हणायचे. नितीन देसाई हे बॉलिवूडमधील मराठी माणसाचा आवाज होते. नितीन देसाई हे भारतीय चित्रपटसृष्टीतील मराठी माणसाचा बुलंद आवाज होते. एनडींनी अशापद्धतीने एक्झिट घेतली ही खूप भयंकर आहे. हे विश्वास न ठेवण्यासारखं आहे.'
'मराठी चित्रपटसृष्टीची खूप मोठी हानी झाली आहे. बॉलिवूडकडे पैसा आहे. पैशाच्या जीवावर ते नितीन देसाई सारखा कोणीतरी निर्माण करतील . पण मराठी चित्रपटसृष्टीने काय करायचे. मराठी चित्रपटसृष्टीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. आपल्याला न परवडणारे, आपल्या आवाक्याबाहेरचं भव्य दिव्य ते आपल्याकडे असलेल्या पैशात द्यायचे. पैसे नको घेऊन जा रे तरडे. फक्त सिनेमा भारी कर, मुळशी पॅटर्नसारखा कर असे ते म्हणायचे.
नितीन देसाईंमुळे चित्रपटातील भव्यता हरपली. ऐवढा मोठा कोण आर्ट डायरेक्टर आहे ज्याच्यासोबत जाऊन आपण हक्काने मराठीमध्ये बोलू शकतो. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटसृष्टीतला मोठा माणूस गेला. एनडी संजय लीला भन्साळी किंवा अशुतोश गोवारीकरला माहित होते अशातला भाग नाही. नितीन देसाई हे आंतरराष्ट्रीय स्थरावरचा होते. आंतरराष्ट्रीय स्थरावरचा दिग्दर्शन हरपला.एनडी स्टुडिओ हा फक्त नितीन देसाईंसाठी महत्वाचा होता असे नाही. तो भारतीय चित्रपटसृष्टीसाठी महत्वाचा आहे. त्याठिकाणी शनिवारवाडा, रायगड, लाल किल्ला, तिथे पेशव्यांचा मोठा दरबार आहे. तिथे रेल्वे स्टेशन आहे. एनडी स्टुडिओमध्ये काय नाही आहे. तिथे सगळं काय आहे.
'इतकं टोकाचं पाऊल का उचचलं असावं हे नितीन देसाईंना माहिती. आपण फक्त अंदाज बांधू शकतो. खरं हे फक्त नितीन देसाईंना माहिती. सतत मोठी स्वप्न पाहणारा, भव्यतेची स्वप्न पाहणारा माणूस का गेला. ऐवढ्या मोठ्या माणसाच्या मनतील वादळं तो मोठा माणूसच समजू शकतो. आपण त्या वादळाचे फक्त अंदाज बांधू शकतो. आमची भेट दोन आठड्यापूर्वीची. त्या भेटीत असे वाटले नव्हते की एनडीए आतुन ऐवढं अस्वस्त असतील. नितीन देसाईंना आर्थिक अडचण असेल असं मला वाटत नाही. कधीच हे जाणवलं नाही. ते स्वत: याबद्दल कधी बोलले नाही. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे. जग कोणासाठीच थांबत नाही. त्यांचे अनेक विद्यार्थी आहेत. त्यांचा वारसा चालवणारे अनेक आहेत. त्यांनी जे निर्माण करुन ठेवले आहे ना ते खूप मोठे काम होते. नितीन देसाईंनी अशापद्धतीने स्वत:चा शेवट केला हे कोणालाच पटणारं नाही. भारतीय चित्रपटसृष्टीचा ते विश्वकर्मा होते.', असं प्रवीण तरडेंनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.