Youtuber Killed: हैदराबादमधील गोलकोंडा येथे राहणाऱ्या प्रसिद्ध फिटनेस कंटेंट क्रिएटर आणि युट्यूबरची दिवसाढवळ्या हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मसूद चांदी ऊर्फ शेख महबूब (SK Mahboob) या २५ वर्षीय युट्यूबरवर त्याच्याच घरात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला असून या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास काही जण महबूबच्या घरात जबरदस्तीने घुसले. त्यांनी लोखंडी सळ्या, जिममधील साहित्य आणि धारदार शस्त्रांच्या सहाय्याने त्याच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या महबूबला आरोपींनी रक्ताच्या थारोळ्यात सोडून घटनास्थळावरून पळ काढला. हल्ला इतका भीषण होता की त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात महबूबच्या पत्नीचा भाऊ शेख सोहेल हा या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. सोहेलने त्याचे मित्र अफू आणि जाबीर यांच्या मदतीने हा हल्ला केल्याचा आरोप आहे. तिघांनी मिळून महबूबवर वारंवार हल्ला करून त्याची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
अतिरिक्त डीसीपी कृष्णा गौड यांनी सांगितले की, आरोपी सोहेलला महबूबबद्दल आधीपासूनच गैरसमज आणि नाराजी होती. त्यातूनच त्याने मित्रांच्या मदतीने हा हल्ला केल्याचा संशय आहे. हत्येमागील नेमके कारण आणि कटाची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी पोलिस सखोल तपास करत आहेत. मृतकाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार बीएनएस कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके तयार केली आहेत.