बॉलिवूडचा (Bollywood) 'दबंग' अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) आज आपला ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडच्या सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सलमान खानचे नाव घेतले जाते. सलमान खान गेल्या ३५ वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे. त्याने बॉलिवूडला १०० पेक्षा अधिक जबरदस्त चित्रपट दिले आहेत. यातील अनेक चित्रपट सुपरहिट ठरले असून त्यांनी बक्कळ कमाई केली आहे.
सलमान खान आज त्याच्या एका चित्रपटासाठी कोट्यवधी रूपये मानधन घेत असला तरी देखील त्याला पहिल्या चित्रपटासाठी फक्त हजारो रुपये मानधन मिळाले होते. भाईजानच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्याला पहिल्या चित्रपटासाठी किती मानधन मिळालं होतं हे जाणून घेणार आहोत...
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ मध्ये मध्य प्रदेशच्या इंदूर येथे झाला. चित्रपट लेखक सलीम खान आणि सुशीला चरक उर्फ सलमा खान यांचा हा मुलगा आहे. सलमानला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री करून तब्बल ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याने वयाच्या २२ व्या वर्षी म्हणजेच १९८८ साली रेखा आणि फारूख शेख यांच्या 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात सलमान खान सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसला होता.
त्यानंतर, सलमान खानने पुढच्याच वर्षीच म्हणजे १९८९ मध्ये 'मैने प्यार किया' या चित्रपटातून नायक म्हणून चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आतापर्यंत त्याने १०० चित्रपटामध्ये काम केले आहे. सलमान खान सध्या एका चित्रपटासाठी तगडं मानधन घेतो. आज सलमान एका चित्रपटासाठी १५ कोटी ते १२५ कोटी रुपये मानधन घेतो. पण त्याच्या चाहत्यांना हे जाणून आश्चर्य वाटेल की, सलमान खानने त्याचा पहिला चित्रपट म्हणजे 'बीवी हो तो ऐसी' साठी फक्त ११ हजार रुपये मानधन मिळाले होते. इतकंच नाही तर दुसऱ्या चित्रपटासाठी म्हणजेच 'मैने प्यार किया'साठी त्याला फक्त ३१ हजार रुपये मानधन मिळाले होते.
दरम्यान, सलमान खानचा शेवटचा चित्रपट 'टायगर ३' होता. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटासाठी सलमान खानने १०० कोटी रुपये मानधन घेतलं होतं. सध्या सलमान खान 'बिग बॉस' हा प्रसिद्ध रियालिटी शो होस्ट करतो. बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी तो १२ कोटी रुपये फी घेतो. इतकेच नाही तर सोशल मीडियावर एका पोस्ट करण्यासाठी सलमान ५० लाख रुपये घेतो. याशिवाय तो अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींसाठीही काम करतो. एका रिपोर्टनुसार, तो एका ब्रँडच्या शूटसाठी ७ कोटी रुपये फी घेतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.