Tiger Shroff Firing Case: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हरियाणातील सोनीपत येथून समीर आणि जतिन या आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक किंवा ताब्यात घेतलेल्या आरोपींची संख्या १० वर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
तपासादरम्यान समीरची भूमिका महत्त्वाची असल्याचा पोलिसांना संशय आहे. गोळीबार करणाऱ्या शूटर्सचा अनिल पंडित याच्याशी संपर्क घडवून आणण्यात समीरने मदत केल्याचा आरोप आहे. अनिल पंडितचे लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याच्या तपासात उघड झाले आहे. शूटर्सना ३५ हजार रुपये देण्याचे आणि परदेशात स्थायिक होण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचा समीरवर आरोप आहे.आता गोळीबाराची योजना कशी आखण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या जतिनची भूमिका देखील महत्वाची आहे. गोळीबारासाठी वापरण्यात आलेल्या बंदूकीचे व्यवस्था करण्यात त्याचा सहभाग होता का, याचा तपास केला जात आहे. गोळीबारासाठी बंदूक कुठून आणण्यात आली, ती कोणाकडे होती आणि गोळीबारानंतर त्यांची विल्हेवाट कशी लावण्यात आली, याची माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
या प्रकरणात यापूर्वी राजस्थानमधील कोटा येथून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्यामध्ये एका अल्पवयीनाचाही समावेश आहे. याशिवाय दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बंदूकींचा पुरवठा करणाऱ्या चार आरोपींना अटक केल्याचे सांगितले जात आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित दोन आरोपी महिलांना देखील अटक करण्यात आले आहे.