Dhasal Movie: विद्रोही कविता, व्यवस्थेविरुद्धचा बुलंद आवाज आणि दलित पँथर चळवळीचा धगधगता इतिहास पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ एका कवीचा जीवनप्रवास नाही. तर अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या विचारांची क्रांती! हेच वादळी व्यक्तिमत्त्व मोठ्या पडद्यावर उलगडणाऱ्या ‘ढसाळ’ या बहुप्रतीक्षित चरित्रपटाचा टीझर नागपूर येथे आयोजिलेल्या धम्मा फेस्टिव्हलच्या भव्य व्यासपीठावर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमधून अभिनेता ललित प्रभाकर याने साकारलेल्या नामदेव ढसाळ यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रभावी झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
बंडखोर विचार, परखड लेखणी आणि सामाजिक वास्तवाला भिडणारी कविता यांच्या जोरावर मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या नामदेव ढसाळ यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर कसा उलगडणार, याची उत्सुकता या टीझरमुळे अधिकच वाढली आहे.
दिग्दर्शिका वरुणा मदनलाल राणा म्हणाल्या, “नामदेव ढसाळ यांचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे म्हणजे एका माणसाचा प्रवास जाणून घेणे एवढेच नाही, तर त्यांच्या विचारांमागची अस्वस्थता, त्यांचा विद्रोह आणि समाजातील अन्यायाविरुद्ध उभे राहाण्याची त्यांची ताकद समजून घेणे आहे. या चित्रपटासाठी आम्ही त्यांच्या आयुष्याचा आणि साहित्याचा अनेक वर्षे अभ्यास केला. त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या विचारांची धार पडद्यावर प्रामाणिकपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. धम्मा फेस्टिव्हलसारख्या महत्त्वाच्या व्यासपीठावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणे आमच्यासाठी विशेष आनंदाची बाब होती.’’
या चित्रपटाला ज्येष्ठ दाक्षिणात्य संगीतकार इलैयाराजा यांचे संगीत लाभले असून, इर्शाद कामील आणि गुरु ठाकूर यांनी गीतलेखन केले आहे. तर या चित्रपटातील गाण्यांना आदर्श शिंदे, दिव्य कुमार, रोहित राऊत, पद्मनाभ गायकवाड, उर्मिला धनगर आणि विभावरी आपटे यांचा आवाज लाभला आहे. अभय सोडये, प्रताप गंगावणे, अश्वजीत कांबळे यांच्या संवादलेखनाने चित्रपटाला प्रभावी धार मिळाली आहे, तर ललित प्रभाकरचा नामदेव ढसाळांच्या रूपातील लूक रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी साकारला आहे. या चित्रपटाचे कला दिग्दर्शन एकनाथ कदम यांनी केले असून डीओपी मिलिंद जोग आहेत. नामदेव ढसाळ यांच्या शब्दांची ताकद, त्यांच्या संघर्षाची धग आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील बंडखोरपणा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी आता प्रेक्षक उत्सुक आहेत.