Bhramacha Bhopala: 'भ्रमाचा भोपळा'चा शतकपूर्तीचा जल्लोष; संजय नार्वेकरांची अभिनयाची रंगभूमीवर जादू

Bhramacha Bhopala: आचार्य अत्रे लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘भ्रमाचा भोपळा’ नाटकाने १०० प्रयोग पूर्ण केले. ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील शंभरावा प्रयोग हाऊसफुल्ल ठरला.
Bhramacha Bhopala
Bhramacha BhopalaSaam Tv
Published On

Bhramacha Bhopala: आचार्य अत्रे लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘भ्रमाचा भोपळा’ या अजरामर विनोदी नाटकाने नुकतेच प्रयोगांचे शतक पूर्ण केले. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे या नाटकाचा शंभरावा प्रयोग पार पडला. विशेष म्हणजे या प्रयोगाला प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळाला. खासदार नरेश म्हस्के यांचीही या विशेष प्रयोगाला उपस्थिती होती.

‘भ्रमाचा भोपळा’ हे नाटक ‘कचेश्वर’ या व्यक्तिरेखेभोवती आणि त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या विनोदी प्रसंगांभोवती फिरते. आचार्य अत्रे यांनी १९३५ मध्ये लिहिलेल्या या नाटकातून विनोदाच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक आणि भावनिक वास्तवावर भाष्य केले आहे. जवळपास नऊ दशकांनंतरही नाटकातील विनोद प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत. प्रेक्षकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्याचीच साक्ष देतो. मूळ चार अंकी असलेल्या या नाटकाचे दोन अंकांमध्ये रूपांतर करणे हे मोठे आव्हान होते. मात्र, दिग्दर्शक विजय केंकरे यांनी हे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे. नाटकातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे.

Bhramacha Bhopala
Actor FIR: प्रसिद्ध अभिनेत्याची दिग्दर्शकाविरोधात पोलिसांत धाव; मारहाण, धमकी अन् मानधन थकवल्याचा आरोप

अभिनेते संजय नार्वेकर साकारत असलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिका हे या नाटकाचे प्रमुख आकर्षण आहे. प्रत्येक भूमिकेतील त्यांचे संवाद आणि अभिनयाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळते. त्यांच्या काही संवादांना नाट्यगृहात ‘वन्समोअर’ची मागणी होत असल्याचेही पाहायला मिळते. संजय नार्वेकर यांच्यासोबत चेतना भट, सुनील तावडे, विजय पटवर्धन, शुभंकर तावडे, वरद चव्हाण आणि अंकित म्हात्रे यांच्या भूमिकांनाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. प्रदीप मुळे यांचे नेपथ्य, मंगल केंकरे यांची वेशभूषा आणि अजित परब यांचे संगीत नाटकाच्या सादरीकरणाला अधिक उठाव देते.

Bhramacha Bhopala
Actress Hospitalised: प्रसिद्ध अभिनेत्रीची अचानक बिघडली तब्येत, तात्काळ रुग्णालयात दाखल; चाहते चिंतेत

भ्रमाचा भोपळा’ची निर्मिती त्रैलोक्य, भूमिका आणि अथर्व या संस्थांनी केली आहे. या नाटकाचे दिग्दर्शन हे विजय केंकरे यांच्या कारकिर्दीतील १११वे नाटक आहे. अल्पावधीत १०० प्रयोगांचा टप्पा गाठणे ही नाटकाच्या लोकप्रियतेची पावती मानली जात आहे.

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनीही या विशेष प्रयोगाला शुभेच्छा दिल्या. “भ्रमाचा भोपळा नाटकात मी काही दशकांपूर्वी काम केले होते. आज हे नाटक पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. संजय नार्वेकर यांच्यासह सर्व कलाकार ताकदीचे काम करत आहेत हे पाहून आनंद झाला. या नाटकाचे १००० प्रयोग होवोत,” अशा शब्दांत त्यांनी नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com