संजय राठोड, साम प्रतिनिधी
विवाहबाह्य संबंधातून एका ३६ वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना यवतमाळमधील राळेगाव शहरात घडलीय. महिलेचा मृतदेह अर्धवट नग्न अवस्थेत जंगलात आढळून आला होता. या घटनेप्रकरणी पोलिसांनी विद्यूत गतीने तपास करत एका आरोपीला अटक केली. आरती शरद कोवे (३६), रा. पिंपरी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेच्या हत्येप्रकरणी गणेश येपारी नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय.
हाती आलेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या राळेगाव शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या सोनुर्ली शिवारातील जंगलामध्ये सकाळी ४ वाजता दरम्यान महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच राळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खून झाल्याचं निर्दशनात आल्यानंतर पोलिसांनी विद्युत गतीने गुन्हाचा तपास करत आरोपीला पकडलं.
हत्येची घटना घडल्यानंतर राळेगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून घातपाताचा संशय व्यक्त केला. महिलेच्या शरीरावर चाकूचे वार होते. तिच्या गळ्यावर,पाठीवर, छातीवर चाकूने वार करण्यात आले होते. यावरून महिलेचा खून झाल्याचा संशय बळावला होता. त्या दिशेनेच पोलिसांनी तपास सुरू केला.
संशयास्पद स्थितीत महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर तक्रार दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी संशयित आरोपीपर्यंत मार्ग काढला. या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून गणेश येपारी रा.राळेगाव याला ताब्यात घेतले. ठाणेदार सीताराम मेहेत्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास करून आरोपीला अटक केली.
गणेश याच्यावर खून आणि अॅक्ट्रॅसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास राळेगाव पोलीस करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी आदिवासी समाज बांधवांकडून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.