
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराडने पुण्यात सीआयडीला शरण गेला. कराड याची चौकशी केल्यानंतर सीआयडीने त्याला अटक केली. यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापलं. देशमुख हत्याप्रकरणात सरकार कठोर कारवाई करत आहे, असं सत्ताधारी नेते म्हणत आहेत. तर दुसऱ्याबाजुला विरोधी पक्ष कराड याच्या आत्मसमर्पणावरून पोलीस यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहेत. त्याचबरोबर एक प्रश्न अनेकांना पडलाय, तो म्हणजे हत्येतील आरोपी कराड इतक्या दिवस कुठे होता?
सरपंच यांची हत्या झाल्यापासून वाल्मीक कराड फरार होता. या हत्या प्रकरणात ७ आरोपींचा समावेश असून त्यातील ४ जणांना पोलिसांनी अटक केली होती. तर कराडसह तीन आरोपी फरार होते. या तिन्ही आरोपींच्या शोधासाठी सीआयडीने आणि पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली होती. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सीआयडीने आरोपींची आणि त्यांच्या नातेवाईकांची बँक खाते गोठवली.
त्याच दरम्यान कराड उज्जैनला असल्याची माहिती समोर आली. उज्जैनमधील महाकाल महादेवाचं दर्शन घेतल्यानंतरचा त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोत त्याच्यासोबत त्याचे अंगरक्षक होते. या फोटोवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी पोलीस आयुक्तांना धारेवर धरलं होतं.
वाल्मीक कराडचा शोध घेण्यासाठी सीआयडीने अनेक पथकं तयार केली होती. उज्जैनमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर सीआयडीचे ९ पथकं भारतभरात त्याचा शोध घेत होते. परंतु वाल्मिक कराड महाराष्ट्रातच असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांच्या पथकाने राज्यातील विविध भागात तपास सुरु केला.
देशमुख यांची हत्या झाल्यापासून कराड फरार झाला होता. राजकीय दबाव वाढल्यानंतर या हत्या प्रकरण सीआयडीकडे देण्यात आले. साधारण २१ ते २२ दिवस झाले तरीही कराडचा थांगपत्ता पोलिसांना लागत नव्हता. सीआयडी तपास चालू असताना कराडचा उज्जैनमधील फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर आज कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. यावरून कराड पुण्यातच होता का ? असा सवाल केला जात आहे.
जर तो पुण्यात होता तर पोलिसांना याची माहिती का मिळाली नाही. ते त्याचा शोध का घेऊ शकले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण गेल्यानंतर संभाजी राजे छत्रपती यांनी मोठा आरोप केलाय. शरण जाण्याच्या एका दिवसाआधी मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
त्यानंतर आज कराड पोलिसात शरण गेला. यामागे काहीतरी दडलंय अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. वाल्मिक कराड हा तीन दिवस पुण्यात राहिला हे पोलिसांना समजलं कसं नाही असा सवाल संभाजीराजे यांनी केलाय. वाल्मीक कराड शरण झाला म्हणजे विषय संपला नाहीये. याउलट आता जबाबदारी वाढलीय. त्याचा सीडीआर काढला पाहिजे. कराड तीन दिवसापासून पुण्यात होता. तरी पोलिसांना समजलं कसं नाही? तपासातील किती मोठी त्रुटी आहे. त्याला २२ दिवसांनी शरण यावं असं सुचलं. तो शुद्धीत असता तर दुसऱ्या दिवशीच झाला असता असं संभाजी राजे म्हणाले.
वाल्मिक कराड शरण झाला म्हणजे विषय संपला नाहीये. आता जबाबदारी वाढलीय. त्याचा सीडीआर काढला पाहिजे. तीन दिवस तो पुण्यात राहिला आणि पोलिसांना समजलं कसं नाही? -
संभाजीराजे छत्रपती
वाल्मीक कराड याला अटक केल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. देशमुख हत्याकांडातील आरोपी फासावर लटकेपर्यंत पोलीस स्वस्थ बसणार नाही. या प्रकरणात ज्याचा संबंध आढळेल त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. राज्यात गुंडांचे राज्य चालवू दिलं जाणार नाही. कुणालाही अशाप्रकारे हिंसा करता येणार नाही आणि खंडणी मागता येणार नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.
मात्र विरोधी पक्षातील नेत्यांनी यावरून सत्ताधारी टीका केलीय. तसेच पोलीस यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलेत. वाल्मीक कराड याच्या आत्मसमर्पणावरून संभाजीराजे छत्रपती यांनी गंभीर आरोप केलाय. मंत्री धनंजय मुंडे यांनी काल मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. आज वाल्मीक कराड याने पुण्यात सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं. यावरुन यात संशय येत असल्याचं संभाजी राजे छत्रपती म्हणाले.
९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची केज मांजरसुंबा रोडवरील टोलनाक्या जवळून अपहरण करून हत्या झाली होती. यानंतर अपहरणाचा आणि हत्येचा गुन्हा केज पोलिसात दाखल करण्यात आला. या प्रकरणात वाल्मीक कराड याचे नाव आल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. मोठी चर्चा या हत्या प्रकरणात होऊ लागली.
कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्याने या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली. त्यानंतर राजकीय नेत्यांनी या हत्याप्रकरणात उड्या घेतल्या. बघता बघता या प्रकरणाने राज्यातील राजकारण ढवळून काढलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.