

“पैसा डबल” करण्याच्या आमिषाला बळी पडून एकानं गमावले ५ लाख रुपये.
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचं आमिष देण्यात आलं होतं.
शेअर मार्केटच्या नावाने गंडा घालणाऱ्या ४ जणांना अटक करण्यात आलीय.
संजय गडदे, साम प्रतिनिधी
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ‘पैसा डबल’ करण्याचे आमिष दाखवत एकूण 5 लाख 72 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ओशिवरा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
फिर्यादी राजू मदन मोहन छिब्बेर (रा. आदर्श नगर, अंधेरी पश्चिम) यांना 20 ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत अनोळखी क्रमांकावरून फोन आला. “आप ट्रेडिंग मे पैसा डालो, मै आपको डबल करके दूंगा” असे सांगत फोन करणाऱ्याने गुंतवणुकीच्या नावाखाली फिर्यादीकडून 5,72,000 रुपये उकळले. फसवणुकीची जाणीव होताच 11 ऑक्टोबर रोजी ओशिवरा पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.
फसवणूक केलेल्या रकमेतील काही हिस्सा बँक ऑफ बडोदा खात्यात जमा झाल्याचे आढळून आले. हे खाते ‘समीर इंटरप्रायजेस’ नावाने नोंद असून त्याचा मालक मोहम्मद अकील शेख असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर खात्याशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले आणि लोकेशन धारावी परिसरात असल्याचे दिसून आले. ओशिवरा पोलिसांच्या सायबर पथकाने धारावीतील 90 फूट रस्त्यावर मोहम्मद अकील शेख याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांची नावे उघड केली – विजयकुमार पटेल आणि राजेंद्र विधाते. दोघांना ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली.
या तिघांकडे चौकशीत समोर आले की विविध कंपनींच्या नावाने खोट्या कागदपत्रांवर अनेक बँक खाती उघडण्यात आली होती. या खात्यांचे किट (यूजर आयडी, पासवर्ड, डेबिट कार्ड, चेकबुक इ.) ते त्यांच्या चौथ्या साथीदार अक्षय कणसेला पुरवत होते. तांत्रिक तपासानंतर कणसेला घाटकोपर येथून ताब्यात घेण्यात आले. मोहम्मद अकील शेख (32),विजयकुमार सरबतजीतप्रसाद पटेल (32), राजेंद्र बळवंत विधाते (50), अक्षय अशोक कणसे (33) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.