डोंबिवलीत ‘फिनिक्स इन्व्हेस्टमेंट’ घोटाळा उघडकीस
शंभरहून अधिक गुंतवणूकदारांची ४ ते ५ कोटींची फसवणूक
या प्रकरणी चार आरोपी अटकेत असून त्यांना ६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ठाणे EOW कडून फरार आरोपींचा शोध आणि तपास सुरू आहे.
संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली
डोंबिवली परिसरात कोट्यवधी रुपयांचा मोठा गुंतवणूक घोटाळा उघडकीस आला आहे. ‘फिनिक्स इन्व्हेस्टमेंट’ आणि ‘फिनिक्स फायनान्शियल सोल्युशन एल.एल.पी.’ या नावाखाली भागीदारी संस्था स्थापन करून तब्बल शंभरहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात प्रमुख आरोपी गौरव भगत, बिपिन पाटणे, देवेंद्र तांबे आणि अमोल तायडे यांना ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (EOW) पथकाने अटक केली आहे. त्यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं. तर फरार आरोपींचा शोधही पोलीस घेत आहे.न्यायालयाने या चौघांनाही ६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
फसवणूक प्रकरणातील सुरुवातीची तक्रार डोंबिवली पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. तब्बल ८० गुंतवणूकदारांनी स्वतंत्रपणे तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, आरोपींनी लोकांना आकर्षक परतावा आणि बोनस स्कीम दाखवून सुमारे चार ते पाच कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर या तपासाची सूत्रं ठाणे EOW कडे देण्यात आली.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना थोडाफार नफा देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. "तुमचे पैसे सुरक्षित आहेत, आणखी नफा मिळेल" अशा आश्वासनांवरून अनेकांनी आपली मूळ रक्कमही वाढवून गुंतवली. पण काही महिन्यांतच नफा देणं थांबलं आणि गुंतवणूकदारांनी रक्कम मागितल्यावर टाळाटाळ सुरू झाली. त्यानंतर आरोपींनी संपर्क टाळायला सुरुवात केली.
ठाणे EOW च्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी मोठ्या प्रमाणावर पुरावे गोळा केले असून, आरोपींनी पैशांचा नेमका वापर कुठे केला याचा शोध घेतला जात आहे. या आरोपींच्या बँक खात्यांमधील व्यवहार, मालमत्ता आणि आर्थिक हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. याशिवाय या घोटाळ्यात सामील असलेल्या इतर फरार आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं तैनात करण्यात आली आहेत.
दरम्यान, या प्रकरणामुळे डोंबिवली आणि परिसरातील गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड असंतोष आणि भीतीचं वातावरण आहे. अनेक गुंतवणूकदार ठाणे EOW कडे आपापल्या तक्रारी नोंदवत आहेत. भविष्यात अशा योजनांमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे. या प्रकरणातील चौकशी पुढील काही दिवसांत कोणते नवे धागेदोरे उघड करते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.