

Mumbai pune petrol diesel rate today : इंधनाच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. आज पुन्हा एकदा देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. आठवडाभरात दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करण्यात आली असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याआधी गेल्या आठवड्यातच पेट्रोलच्या किमतीत तब्बल ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. या धक्क्यातून सर्वसामान्य नागरिक सावरत नाहीत तोच आज पुन्हा इंधनाचे दर वाढवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात पेट्रोल प्रति लिटर ९१ पैशांनी महागले आहे. तर डिझेल प्रति लिटर ९४ पैशांनी महागले आहे. इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात एका आठवड्यात दुसऱ्यांदा इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
एकीकडे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध नाही, तर दुसरीकडे दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे . या दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होणार असून, भाजीपाला, धान्य आणि कडधान्य यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आधीच वाढू लागल्या आहेत. जर ही दरवाढ अशीच सुरू राहिली, तर नागरिकांना प्रचंड महागाईचा सामना करावा लागेल. सध्या बाजारात इंधनाचा साठा कमी असल्याचे सांगितले जात असल्याने, आता या गंभीर परिस्थितीवर सरकार काय उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर काय ?
राजधानीत पेट्रोल ८७ पैशांनी महाग झाले असून ते ९८.६४ रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. दिल्लीत डिझेलच्या दरातही ९१ पैशांची वाढ झाली असून ९१.५८ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. मुंबईत पेट्रोल ९१ पैशांनी वाढून १०७.५९ रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल ९४ पैशांनी वाढून ९४.०८ रुपये प्रति लिटर झाले आहे. कोलकातामध्ये पेट्रोलमध्ये सर्वाधिक ९६ पैशांची वाढ झाली असून ते १०९.७० रुपये प्रति लिटर झाले आहे. तर डिझेल ९४ पैशांनी वाढून ९६.०७ रुपये प्रति लिटर झाले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ८२ पैशांनी महाग होऊन १०४.४९ रुपये प्रति लिटर झाले आहे आणि डिझेल ८६ पैशांनी वाढून ९६.११ रुपये प्रति लिटर झाले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमतींवर थेट परिणाम याचा होणार आहे. इंधन महाग होत असल्याने बस, टॅक्सी आणि वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात जर कच्च्या तेलाच्या किमती वाढतच राहिल्या, तर येत्या काळात पेट्रोल आणि डिझेल आणखी महाग होऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.