

दिवाळीच्या दिवसात सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते, असा अंदाज Oxford Economics च्या अहवालात देण्यात आल्याचं Bloomberg ने म्हटले आहे. इंधनाचे दर वाढल्यावर फक्त वाहनधारकांनाच नाही, तर वाहतूक खर्च आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींनाही त्याचा फटका बसू शकतो. पण पेट्रोल-डिझेल दरवाढीबद्दल अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
Bloomberg च्या वृत्तानुसार, Oxford Economics या प्रमुख अर्थतज्ज्ञ अलेक्झांड्रा हरमन प्रसाद यांच्या विश्लेषणात नोव्हेंबरमध्ये दर वाढण्याची शक्यता असल्याचं नमूद केलं आहे. हा बदल इंधनाचे दर वाढवण्यासाठी सरकारसमोरचा शेवटच्या व्यावहारिक संधींपैकी एक असू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. २०२७ मध्ये उत्तर प्रदेश आणि पंजाबसह सात राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या प्रचाराला वेग येण्याआधी इंधन दरवाढ होऊ शकते, असं या विश्लेषणात म्हटलं आहे.
अहवालातल्या अंदाजानुसार, नोव्हेंबरमध्ये इंधनाच्या किमतीत ३.७५ टक्क्यांची वाढ होऊ शकते. मे महिन्यात झालेल्या एकूण ७.५ टक्के दरवाढीच्या तुलनेत ही वाढ निम्मी असण्याची शक्यता आहे. मात्र ही संभाव्य वाढ असून प्रत्यक्ष याचे दर किती वाढतील, हे अधिकृत निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.
इंधन महागल्यावर वाहतूक खर्च वाढून खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो. Oxford Economics च्या अंदाजानुसार, किरकोळ महागाई ऑक्टोबर - डिसेंबर २०२६ तिमाहीत ६.२ टक्के, तर जानेवारी - मार्च २०२७ मध्ये ६.५ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. हे आकडे रिझर्व्ह बँकेच्या २ ते ६ टक्क्यांच्या महागाई लक्ष्यापेक्षा जास्त आहेत.
महागाईचा दबाव कायम राहिल्याने रिझर्व्ह बँक डिसेंबर आणि फेब्रुवारीच्या पतधोरण बैठकीत प्रत्येकी ०.२५ टक्के दरवाढ करू शकते, असा Oxford Economics चा अंदाज आहे. मात्र हा संभाव्य अंदाज असून RBI चा अंतिम निर्णय महागाई आणि आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असेल. त्यामुळे दिवाळीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. अधिकृत घोषणा होईपर्यंत दरवाढ निश्चित मानणे योग्य ठरणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.