

आंतरराष्ट्रीय बाजारामुळे भारतात इंधन दरवाढ
पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त का झाले
भारत आणि पाकिस्तान पेट्रोल दर तुलना
एकीकडे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, दुसरीकडे पाकिस्तान सरकारने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देत पेट्रोल आणि हाय-स्पीड डिझेलच्या (HSD) दरात प्रति लिटर ५ रुपयांनी कपात केली आहे. नव्या माहितीनुसार, नवीन दर १६ मे २०२६ पासून लागू झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ- उताराच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या पाच रुपयांच्या दर कपातीनंतर पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे नवीन दर ₹४०९.७८ प्रति लिटर आणि डिझेलचा दर ₹४०९.५८ प्रति लिटर झाले आहेत. भारतीय चलनानुार पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींची किंमत प्रति लिटर सुमारे १४० ते १४१ भारतीय रुपये आहे.
याचा अर्थ असा की, ही कपात होऊनही, पाकिस्तानमधील इंधन दर भारतापेक्षा अधिक आहेत. मागील साप्ताहिक आढावा बैठकीत पाकिस्तान सरकारने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १४.९२ रुपयांनी आणि डिझेलच्या दरात १५ रुपयांनी वाढ करून ग्राहकांना मोठा धक्का दिला होता.
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायल यांचा इराणसोबत संघर्ष सुरू झाल्यापासून शहबाज शरीफ सरकार पेट्रोलियमच्या किमतींचा साप्ताहिक आढावा घेत आहे. या आंतरराष्ट्रीय तणावामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली, यामुळे जागतिक इंधन संकट निर्माण झाले आहे. शांततेच्या काळात, जगातील तेल आणि वायू पुरवठ्यापैकी अंदाजे २० टक्के पुरवठा या महत्त्वपूर्ण सागरी मार्गातून होतो.
भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला असून दर वाढवण्यात आलेत. प्रति लिटर ₹३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सध्या, राजधानी दिल्लीत पेट्रोल सुमारे ₹ ९७.७७ आणि डिझेल ₹९०.६७ रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल ₹ १०६ रुपयांपेक्षा जास्त आहे. भारताच्या तुलनेत आपल्या शेजारी देशांमधील परिस्थिती खालीलप्रमाणे आहेत.
नेपाळमध्ये पेट्रोल आणि डिझेल भारतापेक्षा महाग आहेत. भारतीय चलनानुसार नेपाळमध्ये पेट्रोलची किंमत सुमारे ₹ १३४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत सुमारे ₹ १३९ रुपये प्रति लिटर आहे.
बांगलादेशमधील परिस्थिती थोडी संमिश्र आहे. तेथे पेट्रोलचे दर भारतीय रुपयांमध्ये सुमारे १०९ रुपये प्रति लिटर आहेत. भारतापेक्षा थोडे जास्त महाग आहेत. परंतु डिझेलचे दर सुमारे ९० रुपये प्रति लिटर आहेत.
दीर्घकाळाच्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत इंधनाचे दर वधारले आहेत. भारतीय रुपयांनुसार येथे डिझेलचे दर सुमारे १३७ रुपये प्रति लिटर आहे.
भूतान हा काही मोजक्या शेजारी देशांपैकी एक आहे तेथे पेट्रोल आणि डिझेलचे दर भारतासारखेच आहेत. तिथे पेट्रोलचे दर सुमारे ₹ १०२ आणि डिझेलची किंमत सुमारे ९८ रुपये आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.