

PM Kisan 24th Installment : राज्यात पावसाने पाठ फिरवली असून नद्या कोरड्या पडल्या आहेत आणि धरण, तलावांमधील पाणीसाठा मर्यादित झाला आहे. पिके पाण्याअभावी शेतातच जळून गेली आहेत. त्यामुळे सरकारकडून राज्यातील दुष्काळाची तीव्रता तपासली जात आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची अग्रिम मदत दिली जाणार आहे.
मात्र नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन हप्ते आधीच थकीत आहेत आणि पीएम किसान योजनेचाही प्रलंबित हप्ता अद्याप मिळालेला नाही. आधीच ६ हजार रुपये थकीत असताना शेतकऱ्यांना दिवाळीत ५ हजार रुपयांची मदत म्हणजे थट्टाच असल्याची टीका केली जात आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनांच्या हप्त्याची राज्यातील शेतकरी वाट पाहत आहेत. त्यातच दुष्काळाची स्थिती असल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे '६ हजार रुपये थकवून ५ हजार रुपयांची मदत ही कसली दिवाळी?' असा संतापही काही शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. (Namo Shetkari 9th and 10th installment latest update)
नमो शेतकरी योजनेमार्फत राज्य सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये (३ टप्प्यांत) दिले जातात. त्याशिवाय, केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतही ६ हजार रुपयांची मदत दिली जाते. मात्र, नमो शेतकरी योजनेचा नववा आणि दहावा हप्ता अजूनही मिळालेला नाही. या दोन हप्त्यांपोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे ४ हजार रुपये मिळणे बाकी आहे. आता अकराव्या हप्त्याची वेळ जवळ आली असताना त्याबाबतही अनिश्चितता कायम आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे सरकारकडून दिली जाणारी मदत कधी मिळणार, याबाबत शेतकर्यांमध्ये संभ्रम आहे. आता ५ हजार रुपयांची अग्रिम मदत दिली जाणार असली, तरी ती खात्यावर कधी येणार हे निश्चित नाही. (PM Kisan 24th installment expected date November)
दुसरीकडे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता नोव्हेंबरमध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्याबाबतची पूर्वतयारी सुरू आहे. लाभार्थ्यांच्या याद्या तपासणे आणि त्रुटींची पूर्तता करण्याचे काम सुरू असले, तरी केंद्र सरकारने हप्ता जमा करण्याची अधिकृत तारीख अजून जाहीर केलेली नाही. पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत राज्य सरकारकडून अतिरिक्त सहा हजार रुपये दिले जातात. दोन्ही योजनांचे मिळून वर्षाला १२ हजार रुपये तीन समान हप्त्यांत मिळतात.
नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता २५ मार्च २०२६ रोजी जमा झाला होता; परंतु त्यानंतरचे दोन हप्ते रखडले आहेत. राज्यातील सुमारे ९२ लाख शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत. नवव्या आणि दहाव्या हप्त्यांसाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे ३,७०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. पीएम किसानचा २४ वा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीतील नमो शेतकरी योजनेच्या अकराव्या हप्त्याची मागणी केली जाणार आहे. मात्र, आधीचे दोन हप्ते कधी मिळणार याबाबत सरकारकडून स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.