

१ ऑगस्टपासून अनेक आर्थिक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार.
एलपीजी सिलेंडरच्या दरांकडे सर्वसामान्यांचे लक्ष.
रेल्वे तिकीट आणि प्रवासाशी संबंधित नियमांमध्ये बदल अपेक्षित.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतींपासून ते बँका आणि रेल्वेशी संबंधित नियमांपर्यंत अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा परिणाम सर्व स्तरांवर दिसून येईल. घरातील स्वयंपाकघरांपासून ते दैनंदिन वस्तूंच्या खरेदी-विक्रीवर या बदलाचा परिणाम दिसून येईल.
गॅस कंपन्या १ ऑगस्ट रोजी एलपीजी (LPG) सिलिंडरचे सुधारित दर जाहीर करणार आहेत. टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनपासून ते विविध एफएमसीजी (FMCG) उत्पादनांपर्यंत अनेक वस्तू महाग होऊ शकतात. याव्यतिरिक्त, बँकिंग आणि रेल्वेच्या नियमांमध्येही महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला देशभरातील काही वस्तू्ंच्या किंमतींमध्ये बदल घडत असतात. १ ऑगस्ट २०२६ रोजी तेल विपणन कंपन्या एलपीजी सिलिंडरचे सुधारित दर जाहीर करतील. जुलैच्या सुरुवातीला कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली होती, परंतु ही कपात प्रामुख्याने १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी लागू होती. दरम्यान १४ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, घरगुती सिलिंडरच्या किमतीत बदल होतील अशी अपेक्षा लोकांना आहे.
एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतींमधील बदलांसोबतच तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी विमान इंधनाचे (किंवा एअर टर्बाइन फ्युएल - ATF) नवीन दरही जाहीर करत असतात. एटीएफच्या दरांमधील बदलांचा थेट परिणाम विमान प्रवाशांच्या प्रवासाच्या खर्चावर होत असतो. या पार्श्वभूमीवर १ ऑगस्ट रोजी हे स्पष्ट होईल की या कपातीमुळे विमान प्रवाशांचा खर्च कमी होईल की दरवाढीमुळे खर्च वाढेल.
भारतीय रेल्वे 'तत्काळ' तिकीट बुकिंगशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. या नवीन व्यवस्थेनुसार टोकन वाटप आणि तत्काळ तिकीट बुकिंगची वेळ एकाच वेळी सुरू होईल. यामुळे आरक्षण खिडक्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. तसेच यामुळे प्रवाशांसाठी तिकीट बुकिंगची प्रक्रिया अधिक सुलभ होईल. आतापर्यंत प्रवाशांना टोकन घेणं आणि नंतर तिकीट बूक करण्यासाठी वेगवेगळे काउंटरला जावे लागत होते.
ऑगस्ट महिन्याची सुरुवातच वाढत्या किमतींच्या झटक्याने होऊ शकते. सणासुदीच्या काळात सकाळच्या चहापासून ते कपडे, टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनपर्यंत अनेक वस्तूंच्या किंमतींमध्ये दरवाढ पाहायला मिळू शकते. बाजारपेठेतील तज्ज्ञांच्या मते पुढील महिन्यापासून अनेक क्षेत्रांतील वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन्स आणि टेलिव्हिजन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीत ४ ते ६ टक्क्यांची वाढ होऊ शकते.
१ ऑगस्ट २०२६ पासून अनेक बँका त्यांच्या सेवांसाठीचे शुल्क बदलणार आहेत. यामध्ये 'उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक'चाही समावेश असून, ही बँक त्या तारखेपासून ग्राहकांसाठीच्या एसएमएस (SMS) अलर्ट शुल्कात बदल करणार आहे. आता मासिक मर्यादेसह ३० पैसे प्रति एसएमएस दर लागू होईल. डेबिट कार्डच्या देखभाल शुल्कात किंवा इतर सेवा शुल्कात होणाऱ्या कोणत्याही बदलांबाबत ते बँकेकडून माहिती मिळवू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.