

आखातात युद्ध पेटलंय. अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत.मात्र याचा फटका आता जगभरातल्या सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. या तीन देशांमधल्या संघर्षाने जागतिक अर्थव्यवस्थेची झोप उडवलीय. जर हे युद्ध 40 दिवसांपेक्षा जास्त काळ चाललं तर जगात अन्नधान्यांचा तुटवडा आणि महागाईचा भडका उडण्याचा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिलाय. युद्धामुळे महागाई कशी वाढणार ते पाहूयात.
संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटनेच्या आक़डेवारीनुसार जागतिक अन्नधान्यांच्या किमतींनी गेल्या सहा महिन्यांतला उच्चांक गाठलाय. मार्च 2026 मध्ये अन्न दर निर्देशांक 128.5 इतका होता. तर अन्नधान्याच्या किंमतीत वार्षिक 1% तर यात फेब्रुवारीत 2.4 टक्क्य़ांची वाढ झालीय. खाद्य तेलाच्या दरात 5.1 टक्के, गव्हाच्या किंमतीत 4.3 टक्के तर साखरेची किंमत 7.2 टक्क्यांनी वाढली. मांसाहारी आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही 1 ते 1.2% वाढ झालीय.
मुळात या महागाईमागे मुख्य कारण आहे 'होर्मुझची सामुद्रधुनी'...इराण आणि अमेरिकेतील संघर्षामुळे हा जलमार्ग बंद होण्याची भीती आहे. जर इथून कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे थांबला, तर डिझेल-पेट्रोलचे दर आकाशाला भिडतील. त्याचा वाहतूक खर्चावर परिणाम होईल आणि शेतातील अन्नधान्य शहरापर्यंत पोहोचवण्याचा खर्च दुपटीवर जाणार. याचा सर्वाधिक फटका पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेसारख्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थांना बसू लागलाय. त्यात अर्थतज्ज्ञ मॅक्सिमो टोरेरो यांनी जगाला काय इशारा दिलाय. पाहूयात.
युद्धाच्या 40 दिवसांनंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानं खते महाग होतील. खर्च परवडत नसल्याने शेतकरी खतांचा वापर कमी करतील आणि त्याचा थेट उत्पादन वाढीवर परिणाम होणार. त्यामुळे गव्हाचे जागतिक उत्पादन 1.7 टक्क्यांनी घटण्याचा अंदाज असून 820 दशलक्ष टनांपर्यंत गव्हाचं उत्पादन खाली येण्याचा अंदाज व्यक्त होतोय.
दरम्यान भारत जरी अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण असला, तरी जागतिक बाजारातील खतांच्या किमती आणि इंधनाचे दर भारतीयांच्या खिशाला कात्री लावणारे ठरतील. अशातच गव्हापासून ते खाद्य तेलापर्यंत प्रत्येक वस्तूच्या किमतीत आंतरराष्ट्रीय दबावामुळे वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे युद्ध रणांगणावर खेळलं जात असलं, तरी त्याची किंमत गरिबाला मोजावी लागेल. त्यामुळे 40 दिवसानंतरही युद्ध थांबलं नाही तर जगावर अन्नधान्यांचं संकट कोसळेल, हे निश्चित.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.