GPF Rules: सरकारी कर्मचारी दर महिन्याला आपल्या पगारातील काही पैसे जनरल प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच GPF मध्ये जमा करतात. ही रक्कम भविष्यात उपयोगी पडावी, यासाठी ही बचत केली जाते. पण एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या GPF खात्यातील पैसे कोणाला मिळतात? कुटुंबातील सदस्यांना की नॉमिनीला? याबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचे नियम सांगितले आहेत.
कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने २९ ऑक्टोबर २०२६ रोजी याबाबत एक कार्यालयीन आदेश जारी केला आहे. यामध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर GPF खात्यातील पैसे कोणाला मिळतील, हे सांगण्यात आले आहे. कर्मचाऱ्याचा मृत्यू होण्यापूर्वी GPF चे पैसे मिळाले नसले आणि खात्यात जमा होण्याआधीच मृत्यू झाला असेल, तरी अशा परिस्थितीत पैसे कोणाला द्यायचे, याचे नियम सांगण्यात आले आहेत.
GPF म्हणजेच जनरल प्रॉव्हिडंट फंड ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बचत योजना आहे. जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPS अंतर्गत येणारे कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र, NPS आणि UPS योजनेतील कर्मचाऱ्यांना GPF ची सुविधा मिळत नाही.
जर कर्मचाऱ्याने आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव नॉमिनी म्हणून दिले असेल, तर त्याच्या मृत्यूनंतर GPF मधील पैसे त्या व्यक्तीला मिळतील. जर एकापेक्षा जास्त नॉमिनी असतील, तर फॉर्ममध्ये ज्या प्रमाणात पैसे देण्याचे नमूद केले आहे, त्यानुसार रक्कम वाटली जाईल. पण कर्मचाऱ्याने कुटुंबातील कोणाचेही नाव नॉमिनी म्हणून दिले नसेल, तर GPF मधील पैसे कुटुंबातील पात्र सदस्यांना समान प्रमाणात दिले जातील. तसेच कुटुंबातील पात्र सदस्य असताना कुटुंबाबाहेरील व्यक्तीच्या नावाने केलेले नॉमिनेशन मान्य केले जाणार नाही.
सरकारने GPF चे पैसे मिळण्यासाठी काही नियम ठरवले आहेत. त्यानुसार खालील व्यक्तींना या रकमेतील हिस्सा मिळणार नाही. १८ वर्षांवरील मुलगे, पती जिवंत असलेल्या विवाहित मुली त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला GPF चे पैसे मिळतीलच असे नाही. त्यासाठी सरकारी नियमांनुसार पात्र असणे आवश्यक आहे. तसेच, एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याच्या मुलाचा त्याच्या आधीच मृत्यू झाला असेल, तर त्या मुलाची पत्नी आणि मुलांनाही GPF मधील पैसे मिळू शकतात.
कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर GPF चे पैसे देण्यापूर्वी कार्यालय प्रमुख किंवा लेखा अधिकारी सर्व कागदपत्रे तपासतील. यामध्ये कर्मचाऱ्याचे GPF खाते, नोकरीची माहिती आणि नॉमिनीचे नाव तपासले जाईल. तसेच पैसे मिळण्यासाठी कोण पात्र आहे, याचीही खात्री केली जाईल. सर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतरच संबंधित व्यक्तींना पैसे दिले जातील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.