

जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील मोठे यश मिळवू शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण माण तालुक्यातील कासारवाडी येथील मयुरी रेखा राजाराम सस्ते हिने घालून दिले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘गट क’ परीक्षेत तिने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत मंत्रालयातील ‘महसूल सहाय्यक’ पदावर झेप घेतली आहे.
मयुरीचे प्राथमिक शिक्षण मलवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर तिने माध्यमिक शिक्षण त्रिंबकराव काळे विद्यालय, मलवडी येथे पूर्ण केले. पुढे दहिवडी येथील महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर कराड येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय, रेठरे बुद्रुक येथून तिने कृषी पदवी संपादन केली.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मयुरीने सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षांचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. २०२२ पासून ती कृषी अधिकारी आणि पोलिस उपनिरीक्षक पदासाठी अभ्यास करत होती. रयत शिक्षण संस्थेच्या अभ्यासिकेत अभ्यास करत असतानाच तिने ‘गट क’ परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मयुरी ही दहिवडीचे माजी नगरसेवक अजित पवार यांची भाची असून, तिच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुढील काळात प्रशासनात कार्यरत राहून जनतेसाठी उत्तम कामगिरी करण्याचा मानस मयुरीने व्यक्त केला आहे.