

Budget 2027: केंद्रीय अर्थसंकल्प २०२७ सादर होण्याआधी देशातल्या कर्मचारी संघटनांनी केंद्र सरकारकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांचे किमान मासिक वेतन ४२ हजार रुपये करण्यापासून ते ग्रॅच्युइटीची मर्यादा ४० लाख रुपये करण्यापर्यंतच्या प्रस्तावांचा समावेश आहे. तसेच आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी आणि गिग वर्कर्ससाठीही आर्थिक मदतीची मागणी केली. मात्र या मागण्या आहेत, त्यावर सरकारने अजून कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.
सध्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटीची मर्यादा २० लाख रुपये आहे. ही वाढवून ४० लाख रुपये केली पाहिजे, अशी मागणी ट्रे़ड युनियनने केली. तसेच ग्रॅच्युइटीचं गणित करताना प्रत्येक पूर्ण वर्षाच्या सेवेसाठी १५ दिवसांपेक्षा २१ दिवसांचं वेतन गृहीत धरावं, असाही प्रस्ताव आहे. त्यामुळे रिटायरमेंटच्या वेळी कर्मचाऱ्यांना जास्त रक्कम मिळू शकते.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU) या संघटनेने देशातल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी महिन्याची सॅलरी ४२ हजार रुपये ठरवण्याची मागणी केली. वाढती महागाई आणि रोजच्या खर्चाचा विचार करून वेतन वाढवणं गरजेचं असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. तसेच नोव्हेंबर २०२५ मध्ये लागू झालेल्या चार नवीन कामगार संहिता मागे घेण्याचीही मागणी करण्यात आली.
डिलिव्हरी पार्टनर आणि इतर गिग वर्कर्सना आरोग्य विमा आणि अपघात विम्याचा लाभ मिळावा, यासाठी स्वतंत्र सामाजिक सुरक्षा निधी तयार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या निधीत ऑनलाइन प्लॅटफॉर्म कंपन्यांनीही योगदान द्यावं, अशी मागणी केली. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांनाही या सुविधांचा लाभ मिळावा, असं सुचवण्यात आलं.
ट्रेड युनियनने आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली. त्यानुसार आशा सेविकांना दर महिन्याला १० हजार रुपये, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये आणि मदतनीसांना १२ हजार रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव आहे. या सर्व मागण्या २० नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या अर्थसंकल्पा आधीच्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर मांडण्यात आल्या. आता अर्थसंकल्प २०२७ मध्ये सरकार यापैकी कोणत्या मागण्यांना मंजुरी देते, याकडे कर्मचारी आणि कामगारांचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.