सोशल मीडियावर आजकाल अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल होऊन फेसम होण्यासाठी बरेच जण कोणत्याही थराला जातात. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. रिलसाठी जीव धोक्यात घालणारा प्रकार पुन्हा मुंबई लोकलमध्ये घडलाय. या धोकादायक स्टंटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
दादर ते वांद्रे दरम्यान धावत्या लोकलमध्ये एका तरुणीने दरवाज्याला लटकत प्रवास करत स्टंट केल्याचं या व्हिडीओत स्पष्टपणे दिसून येतंय. विशेष म्हणजे हा प्रकार केवळ एका तरुणीपुरता मर्यादित नसून तिच्यासोबत दोन तरूणांचाही यामध्ये सहभाग असल्याचं पाहायला मिळतंय.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लोकल ट्रेन वेगात आहे. अशातच ही तरुणी थेट दरवाज्याच्या बाहेर लटकून प्रवास करत असल्याचं दिसतंय. ट्रेन वळण घेत असताना देखील ती न घाबरता स्टंट करताना दिसतेय. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट करून तो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडीओ पाहताना अंगावर काटा येतो.
या प्रकारात सहभागी असलेले दोन तरूण लोकलच्या दरवाज्याजवळ उभे राहून स्टंटमध्ये साथ देताना दिसतायत. काही जण या तरुणीला प्रोत्साहन देताना तर काही जण हा प्रकार शूट करताना दिसतात.
सध्या रील्स आणि व्ह्यूजच्या नादात तरुण पिढी जीव धोक्यात घालणारे स्टंट करत असल्याच्या घटना सातत्याने समोर येतात. याआधीही मुंबई लोकल, रस्ते, पूल किंवा उंच इमारतींवर धोकादायक स्टंटचे व्हिडीओ व्हायरल झालेत. मात्र अशा प्रकारांमुळे अनेक वेळा गंभीर अपघात झाले असून काही जणांना जीवही गमवावा लागला आहे.
या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसतायत. अनेकांनी अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी केलीये. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी या व्हिडीओची दखल घ्यावी आणि दोषींवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी नेटकऱ्यांकडून होतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.