WPL इतिहासात पहिल्यांदाच शतक झळकावण्याचा विक्रम
मुंबई इंडियन्सच्या नॅट सायव्हर-ब्रंटची ऐतिहासिक खेळी
अवघ्या ५७ चेंडूत झळकावले शतक
महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये मुबंई इंडियन्सच्या खेळाडूनं इतिहास रचला आहे. इंग्लंडची स्टार अष्टपैलू खेळाडू नॅट सायव्हर-ब्रंटने WPL इतिहासातील पहिले शतक झळकावत विक्रम मोडलाय. वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (एमआय) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात सामना होतोय. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या फलंदाजानं ऐतिहासिक कामगिरी केलीय.
मुंबई इंडियन्ससाठी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या सायव्हर-ब्रंटने ३२ चेंडूत तिचे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर तिने गीअर्स बदलत अवघ्या ५७ चेंडूत ऐतिहासिक शतक पूर्ण केलं. एमआयच्या डावाच्या २० व्या षटकात तिने शतक पूर्ण केलं.
WPL च्या इतिहासातील १०५७ दिवस आणि ८२ सामन्यांनंतर पहिले शतक झालेलं पाहायला मिळालं. दरम्यान नॅट सायव्हर-ब्रंट हा WPL इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील आहे, त्याने ३५ डावांमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरीने आणि सुमारे १४५ च्या स्ट्राईक रेटने १,३४६ धावा केल्या आहेत.
आजच्या सामन्यात सायव्हर-ब्रंटने सलामीवीर हेली मॅथ्यूजसोबत ७३ चेंडूत १३१ धावांची शानदार भागीदारी केली. तिच्या शतकामुळे मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकांत ४ बाद १९९ धावांचा डोंगर उभा केला. २०० धावांचे आव्हान देणं हे प्लेऑफच्या शर्यतीत खूप महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वी WPL इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या जॉर्जिया वोल आणि न्यूझीलंडच्या सोफी डेव्हाईन यांच्या नावावर होता. या दोघींनी ९९ धावा केल्या होत्या. अवघ्या एका धावेमुळे त्यांचे शतक हुकलं होतं. दरम्यान आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनानेही या हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ९६ धावा करत विक्रमाच्या जवळ पोहोचली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.