WPL 2026 आधीच दिल्ली कॅपिटल्सनं महत्वाची घोषणा केली. वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करून विश्वविजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जला कर्णधार म्हणून नेमलं आहे. डब्ल्यूपीएल 2026 मध्ये दिल्ली संघाची धुरा जेमिमाकडे असणार आहे. ऑस्ट्रेलियाची दिग्गज खेळाडू मेग लॅनिंग हिची जागा जेमिमा घेणार आहे.
लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत तीन वेळा वुमेन्स प्रिमिअर लीगच्या फायनलमध्ये धडक मारली होती. पण तिन्ही वेळा दिल्लीचा संघाची विजेतेपदाची संधी हुकली होती. जेमिमा रॉड्रिग्ज पहिल्या पर्वापासूनच दिल्ली कॅपिटल्समधून खेळत आहे. आतापर्यंत या संघाकडून खेळताना तिनं २७ सामन्यांत ५०७ धावा केल्या आहेत. वुमेन्स प्रिमिअर लीगमध्ये जेमिमाचा स्ट्राइक रेट १३९ हून अधिक आहे. दिल्ली संघाचं प्रतिनिधित्व करताना ती आतापर्यंत या स्पर्धेच्या तीन फायनल सामन्यांमध्ये खेळली आहे.
जेमिमा ही भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आहे. टीम इंडियाला वर्ल्डकप २०२५ चे विजेतेपद जिंकून देण्यात तिचा सिंहाचा वाटा होता. वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमिफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात १२७ धावांची ऐतिहासिक खेळी तिने केली होती. त्या जोरावर भारताने फायनलमध्ये धडक मारली होती.
जेमिमाला दिल्ली कॅपिटल्सने WPL 2026 च्या मेगा ऑक्शनआधी २.२ कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं. दिल्ली संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्यानंतर तिने प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती होणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. संघ मालक आणि सपोर्ट स्टाफचे आभार मानते. सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. हे वर्ष माझ्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी खूपच चांगलं राहिलंय. आधी आम्ही वर्ल्डकप जिंकलो आणि आता दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळत आहे, असं ती म्हणाली.
टी २० क्रिकेटमध्ये जेमिमाने जबरदस्त कामगिरी केली आहे. भारतीय संघाकडून ११३ आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांत २,४४४ धावा केल्या आहेत. त्यात तिने १४ अर्धशतके केली आहेत. ५९ वनडे सामन्यांत तिने १७४९ धावा केल्या आहेत. दरम्यान, वुमेन्स प्रिमिअर लीग २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना १० जानेवारी रोजी मुंबई इंडियन्सच्या विरोधात होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.