चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पुढील वर्षी होणार आहे. मात्र, अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) स्थळ जाहीर केलेले नाही. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होऊ शकते, असे एका अहवालातून समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयसीसीचे एक शिष्टमंडळ १०-१२ नोव्हेंबर दरम्यान लाहोरला भेट देणार आहे. या काळात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुरू असलेल्या तयारीची पाहणी केली जाईल. यादरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक एखाद्या कार्यक्रमात जाहीर केले जाऊ शकते. अहवालात पुढे म्हटले आहे की, प्रतिष्ठित स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसी ११ नोव्हेंबर रोजी जाहीर करू शकते.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्रस्तावित वेळापत्रकानुसार पाकिस्तानला भारतासोबत अ गटात ठेवण्यात आले आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंडचेही संघ आहेत. तर ब गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. मात्र, अद्याप आयसीसीकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत होणार असल्याचे मानले जात आहे.
या अहवालानुसार, भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये होणार आहेत . भारतीय संघ २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. १ मार्च रोजी लाहोरमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामनाही होणार आहे. पहिला उपांत्य सामना (कराची) आणि दुसरा उपांत्य सामना (रावळपिंडी) अनुक्रमे ५ आणि ६ मार्च रोजी खेळवला जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना लाहोरमध्ये ९ मार्चला खेळवला जाऊ शकतो.
Written By: Dhanshri Shintre.