इंडियन प्रिमीयर लीग (IPL) 2025 दरम्यान भारतीय संघाचे दोन दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्यचकित केले होते. एकीकडे, आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा होत असताना, दुसरीकडे मात्र या दोन्ही दिग्गज फलंदाजाची एकदिवसीय सामन्यातून देखील निवृत्तीची बातमी समोर येत आहे. यावर आता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)ने आपले मौन सोडले आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी विराट कोहली आणि रोहित शर्माच्या एकदिवसीय क्रिकेट खेळण्यावर मोठे वक्तव्य केले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे.
काय म्हणाले राजीव शुक्ला?
यूपी T20 लीग दरम्यान एका टॉक शोमध्ये बोलताना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव यांनी विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीवर भाष्य केले आहे. राजीव शुक्ला यांनी विराट कोहली आणि रोहित शर्माच्या एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या अफवांना फेटाळून लावले आहे. ते म्हणाले, विराट आणि रोहित निवृत्ती घेणार नसून अजूनही एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसतील.
टॉक शो दरम्यान एका अँकरने राजीव शुक्ला यांना विचारले की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना सचिन तेंडुलकरसारखा निरोप मिळेल का? यावर राजीव शुक्ला यांनी प्रश्न केला की, "ते कधी निवृत्त झाले? ते दोघेही अजूनही एकदिवसीय सामने खेळत आहेत, जर ते अजूनही खेळत असतील तर निवृत्तीची चर्चा आता का होत आहे? तुम्ही लोक आधीच काळजी का करत आहात?".
बीसीसीआय खेळाडूंना निवृत्ती घेण्यास सांगत नाही...
टॉक शोमध्ये बोलताना राजीव शुक्ला पुढे म्हणाले की, बीसीसीआय कोणत्याही खेळाडूंना निवृत्ती घेण्यास सांगत नाही. हा निर्णय खेळांडूचा असतो. 'आमचे धोरण स्पष्ट आहे, बोर्ड कोणत्याही खेळाडूला रिटायरमेंट घेण्यास सांगत नाही. हा निर्णय स्वतः घ्यायचा असतो'.
विराट कोहली सर्वात फिट फलंदाज
शोमध्ये बोलताना राजीव शुक्ला म्हणाले की, टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली अजूनही सर्वात फिट खेळाडूंपैकी एक आहे. तर रोहित शर्मा हा उत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू आहे. या दोन्ही खेळाडूंच्या निवृत्तीबद्दल विचार करु नका. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू.
दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर परतणार
१९ ते २५ ऑक्टोबर दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार आहेत. टी-२० आणि कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर, त्यांच्या वनडे क्रिकटेमधून निवृत्ती घेण्याच्या बातम्या सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. काहींच्या मते, ऑस्ट्रेलिया दौरा हा या दोन्ही खेळाडूंचा शेवटचा दौरा असू शकतो. परंतु, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी सराव सुरू करून या अफवांना पूर्णविराम दिला आहे. वृत्तानुसार, बीसीसीआय या प्रकरणावर शांत असून या स्टार फलंदाजांच्या भविष्याबद्दल निर्णय घेण्याची घाई करणार नाही.