भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील दुसऱ्या सेमिफायनलचा थरार रंगणार आहे. हे दोन्ही बलाढ्य संघ २७ जून रोजी गयानाच्या मैदानावर आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघाने या स्पर्धेतील सर्व सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडचा संघही तुफान फॉर्ममध्ये आहे.
त्यामुळे या दोन्ही संघ जोरदार लढत पाहायला मिळू शकते. यापूर्वी २०२२ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये भारतीय संघाला इंग्लंडकडून एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला होता. हा सामना जिंकून भारतीय संघाकडे पराभवाची परतफेड करण्याची संधी असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.
या स्पर्धेसाठी भारतीय संघाने आपली सलामी जोडी बदलली आहे. विराट आणि रोहितची जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येत आहे. गयानाची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे कुलदीप यादव आणि आदील राशिदच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे.
सुपर ८ फेरीतील सामन्याची सुरुवात झाल्यापासून मोहम्मद सिराजला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. भारतीय संघ अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहसह मैदानात उतरला आहे. जर या सामन्यासाठी मोहम्मद सिराजचा भारतीय संघात समावेश करण्यात आला, तर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाजीक्रम आणखी मजबूत होईल. सिराजने या स्पर्धेत आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याला केवळ १ गडी बाद करता आला आहे.
त्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. दुसरी शक्यता अशी की, भारतीय संघाने सुपर ८ फेरीतील सामन्यांदरम्यान प्लेइंग ११ मध्ये कुठलाही बदल केलेला नाही आणि सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे या सामन्यातही भारतीय संघ त्याच प्लेइंग ११ सह मैदानात उतरु शकतो.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
इंग्लंड: फिलिप सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार, यष्टीरक्षक), जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिविंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टॉपली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.