आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना आज (२७ जून) गयानाच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० ला तर भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा अहंकार मोडत सेमिफायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे इंग्लंडने अमेरिकेवर एकतर्फी विजय मिळवत सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
दोन्ही संघ तुफान फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यापूर्वी देखील २०२२ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघावर एकतर्फी विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघ पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला तर, दोन्ही संघांचा २३ वेळेस सामना झाला आहे. यादरम्यान भारतीय संघाने १२ वेळेस बाजी मारली आहे. तर इंग्लंडने ११ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. हेड टू हेड रेकॉर्डमध्ये भारतीय संघ आघाडीवर आहे. तर गेल्या ४ सामन्यातील रेकॉर्ड पाहिला तर दोन्ही संघांनी प्रत्येकी २-२ सामने जिंकले आहेत. यासह टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतही दोन्ही संघांचा ४ वेळेस आमना सामना झाला आहे. ज्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी २-२ वेळेस विजय मिळवला आहे.
हा सामना गयाना नॅशनल स्टेडियमवर रंगणार आहे. या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला तर , या मैदानावर आतापर्यंत १८ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ ६ सामने जिंकले आहेत. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी ९ सामने जिंकले आहेत. दरम्यान ३ सामने अनिर्णीत राहिले आहेत. हा रेकॉर्ड पाहता नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने आधी गोलंदाजी करावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.