आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत गोलंदाजांवर तुटुन पडणारा रहमानुल्लाह गुरबाजसोबत क्रिकेटच्या मैदानावर मोठी दुर्घटना घडली आहे. रहमानुल्लाह गुरबाज सध्या शापझिगा क्रिकेट लीग स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. दरम्यान सराव करत असताना चेंडू त्याच्या मानेला जाऊन लागला. ही घटना घडल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, दुखापत गंभीर नसून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं जात आहे.
आयपीएलप्रमाणे अफगाणिस्तानमध्ये शापझिगा ही स्पर्धा खेळली जाते. या स्पर्धेत आयपीएलप्रमाणेच ६ संघ असतात. या स्पर्धेला १२ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान स्पर्धेतील अंतिम सामना २४ ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं, तर या स्पर्धेत अमो शार्क्स, मिस एनेक नाइट्स, बूस्ट डिफेंडर्स, बँड-ए-आमिर ड्रॅगन्स, स्पिन घर टायगर्स, आणि अमो शार्क्स असे ६ संघ आहेत. या ६ संघांमध्ये धमाकेदार क्रिकेट अॅक्शन सुरु आहे.
रहमानुल्लाह गुरबाज हा अफगाणिस्तान संघातील स्टार फलंदाज आहे. आयपीएलच्या २ हंगामांपासून तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधित्व करतोय. आयपीएल २०२३ मध्ये त्याला या संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याची आयपीएल स्पर्धेतील कामगिरी पाहिली, तर त्याला ११ सामन्यांमध्ये २२७ धावा करता आल्या आहे.
रहमानुल्लाह गुरबाजच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याला अफगाणिस्तानकडून ४० वनडे, ६३ टी-२० आणि १ कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १६५७ धावा केल्या आहेत. यासह वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावे १४६७ धावा करण्याची नोंद आहे. अफगाणिस्तानने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. या संघाला सेमीफायनलमध्ये पोहचवण्यात रहमानुल्लाह गुरबाजने मोलाची भूमिका बजावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.