महिला टी-20 एशिया कपमध्ये गुरुवारी भारत आणि हाँगकाँग यांच्यात सामना झाला. दुबईतील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय ओपनर स्मृती मंधानाने तिच्या फलंदाजीने धुमाकूळ घातला. तिने अवघ्या 64 चेंडूंत 124 रन्सची तुफानी खेळी केली. या खेळीत स्मृतीने 14 चौकार आणि 7 सिक्स ठोकलेत.
स्मृतीच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे दुसरं शतक होतं. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिचं हे 18वं शतक होतं. या शानदार खेळीदरम्यान स्मृतीने एक मोठा विक्रमही आपल्या नावे केला आहे. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणारी फलंदाज होण्याचा मान आता तिच्या नावावर आहे.
स्मृती मंधानाने भारताची माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज मिताली राजचा विक्रम मोडलाय. मितालीने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 10,868 रन्स केल्या होत्या. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यानंतर स्मृतीच्या नावावर आता 10,880 आंतरराष्ट्रीय रन्स आहेत.
10,880* – स्मृती मंधाना
10,868 – मिताली राज
10,740 – सुझी बेट्स
10,273 – चार्लोट एडवर्ड्स
10,007 – स्टेफनी टेलर
याच सामन्यात स्मृतीने महिला टी-20 एशिया कपमधील सर्वात मोठी वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रमही केला. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टूच्या नावावर होता. अटापट्टूने 2024च्या एशिया कपमध्ये मलेशियाविरुद्ध नाबाद 119 रन्स केले होते. स्मृतीने 124 रन्सची खेळी करत हा विक्रम नावे केला.
हाँगकाँगविरुद्धच्या खेळीत स्मृतीने 7 सिक्स लगावले. एका महिला टी-20 आंतरराष्ट्रीय डावात भारतीय फलंदाजांकडून सर्वाधिक सिक्स मारण्याच्या यादीत स्मृती आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलीये. तर पहिल्या क्रमांकावर टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर आहे.
8 – हरमनप्रीत कौर विरुद्ध न्यूझीलंड, 2018
7 – स्मृती मंधाना विरुद्ध हाँगकाँग, दुबई, 2026
5 – हरमनप्रीत कौर विरुद्ध श्रीलंका, कटुनायके, 2018
5 – शेफाली वर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, लखनऊ, 2021
5 – शेफाली वर्मा विरुद्ध मलेशिया, हांगझोऊ, 2023
5 – रिचा घोष विरुद्ध वेस्ट इंडिज, मुंबई DYP, 2024
इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या महिला फलंदाजांच्या यादीतही स्मृती मंधाना आता अव्वल स्थानावर पोहोचली आहे. तिच्या नावावर एकूण 18 आंतरराष्ट्रीय शतके आहेत.
स्मृती मंधानाच्या तुफानी शतकानंतर भारतीय गोलंदाजांनीही हाँगकाँगच्या फलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. दीप्ती शर्माच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने महिला एशिया कप टी-20 स्पर्धेतील ग्रुप एच्या सामन्यात हाँगकाँगचा तब्बल 137 रन्सने पराभव केला. या विजयासह भारतीय टीमने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
भारताने हाँगकाँगसमोर 194 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र हाँगकाँगचा डाव भारतीय गोलंदाजांसमोर पूर्णपणे कोलमडला. ऑफस्पिनर दीप्ती शर्माने 9 रन्स देत 3 विकेट घेतल्या. वेगवान गोलंदाज नंदिनी शर्माने 6 धावांत 2 विकेट मिळवल्या. लेगस्पिनर प्रेमा रावतने 12 रन्समध्ये 2 फलंदाजांना बाद केलं. तर डावखुरी फिरकी गोलंदाज श्री चरणीने 16 रन्स देत 2 विकेट्स घेतल्या.
भारतीय गोलंदाजांच्या या भेदक माऱ्यामुळे हाँगकाँगची टीम अवघ्या 16.2 ओव्हर्समध्ये 56 रन्स र ऑलआउट झाली. त्यामुळे भारताने 137 रन्सची दणदणीत विजय मिळवत महिला टी-20 एशिया कपच्या उपांत्य फेरीत मजल मारलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.