आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतीच वनडे फलंदाजांची क्रमवारी जाहीर केलीये. यामध्ये पुन्हा एकदा टीम इंडियाच्या खेळाडूंचा दबदबा दिसून आला आहे. विशेषतः कर्णधार शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा, ईशान किशन आणि यशस्वी जैस्वाल यांनी या क्रमवारीत आपली छाप सोडलीये.
टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल वनडे क्रमवारीत आता पहिल्या क्रमांकाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. 791 रेटिंग पॉईंट्ससह त्याने दुसरे स्थान मिळवलंय. सध्या न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल 816 गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे सिरीजपूर्वी गिल पाचव्या स्थानावर होता. मात्र या सिरीजपूर्वी पहिल्या सामन्यात त्याने 84 रन्स केले, तर दुसऱ्या सामन्यात 154 रन्सची तुफान खेळी साकारली. या कामगिरीमुळे त्याला मोठा फायदा झाला आणि तो थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.
दुसरीकडे, दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये विराट कोहलीला खेळता आलं नाही. त्याचा परिणाम त्याच्या क्रमवारीवर झाला आहे. विराटला एका स्थानाचं नुकसान सहन करावं लागलं असून तो आता 768 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरलाय.
वनडे फलंदाजांच्या टॉप क्रमवारीकडे पाहिलं तर टीम इंडियाच्या खेळाडूंचा दबदबा स्पष्टपणे दिसून येतोय. शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्यासोबत रोहित शर्मा देखील चौथ्या स्थानावर कायम आहे. रोहितच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही. अफगाणिस्तान सिरीजपूर्वी रोहित रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर होतो.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सिरीजमध्ये रोहितने 16, 48 आणि 76 रन्सच्या खेळी केल्या होत्या. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो अव्वल फलंदाजांच्या यादीत आपलं स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरला. दरम्यान केएल राहुलला दोन स्थानांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे त्याला टॉप-10 मधून बाहेर पडावं लागलंय.
अफगाणिस्तानविरुद्ध ईशान किशनने 78 चेंडूत 125 रन्सची आक्रमक खेळी केली होती. या शानदार शतकाचा त्याला मोठा फायदा झाला आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत त्याने तब्बल 21 स्थानांची झेप घेत 43वं स्थान मिळवलंय. यशस्वी जैस्वाललाही आपल्या शतकाचा फायदा झाला आहे. सिरीजच्या अखेरच्या सामन्यात त्याने नाबाद 110 रन्सची खेळी केली होती. या खेळीमुळे त्याने 71वं स्थान गाठलंय
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे सिरीज 14 जुलैपासून सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या सिरीजसाठी टीमची घोषणा केली आहे. यामध्ये विराट कोहलीचं टीममध्ये कमबॅक झालं असलं तरी त्याचा अंतिम सहभाग त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. याशिवाय भारतीय टीमसाठी आणखी एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह तब्बल तीन वर्षांनंतर वनडे क्रिकेटमध्ये कमबॅक करणार आहे. 2023 च्या विश्वचषक फायनलनंतर तो प्रथमच या स्वरूपात खेळताना दिसणार आहे.
शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंह आणि गुरनूर ब्रार यांचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.