मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद कैफविरोधात गुन्हा दाखल
लखनऊमध्ये बलात्काराच्या आरोपांखाली FIR दाखल
एका महिलेने लग्नाचे आश्वासन देऊन कैफने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला
तक्रारीनंतर कैफचा भाऊ हसीब याने धमकी दिल्याचाही आरोप
भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद कैफ याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनऊतील आशियाना पोलीस ठाण्यात एका महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही एफआयआर नोंदवली आहे. संबंधित महिलेने कैफने लग्नाचे आमिष दाखवून आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. तसेच तक्रार केल्यानंतर कैफचा भाऊ हसीब याने धमकी दिल्याचा आरोपही महिलेने केला आहे.
पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, संबंधित महिला घटस्फोटित असून तिला एक मुलगा आहे. २०२० मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून तिची मोहम्मद कैफशी ओळख झाली. त्यावेळी ती गाझियाबादमधील एका पॉश सोसायटीत राहत होती. कैफने आपल्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते, असा महिलेचा दावा आहे. ९ डिसेंबर २०२३ रोजी कोलकात्यातील एका हॉटेलमध्ये कैफने लग्नाचे आश्वासन देत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतरही वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि ठिकाणी आपले लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.
महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने कैफला सुरुवातीपासूनच आपण घटस्फोटित असल्याचे आणि आपल्याला एक मुलगा असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, कैफने तिच्या भूतकाळाबाबत किंवा मुलाबाबत कोणतीही अडचण नसल्याचे सांगितल्याचा दावा तिने केला आहे. एफआयआरनुसार, महिला २०२३ ते २०२६ या काळात नवी दिल्लीतील एका एअरलाइनमध्ये केबिन क्रू म्हणून काम करत होती. कैफला तिने नोकरी करणे आवडत नव्हते आणि त्याच्या सांगण्यावरून तिने नोकरी सोडल्याचा आरोप महिलेने केला आहे.
तसेच डिसेंबर २०२५ मध्ये आयपीएल ऑक्शननंतर कैफने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही लग्न केले नसल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. मे २०२६ मध्ये अमरोहा येथे एका क्रिकेट प्रशिक्षकाच्या घरी कैफची आई आणि त्याचा भाऊ हसीब यांची भेट झाल्याचे महिलेने सांगितले. यावेळी हसीबने आपल्याला धमकी दिल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीच्या आधारे मोहम्मद कैफविरोधात बलात्काराच्या आरोपांखाली, तर हसीबविरोधात धमकी दिल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केली आहे. या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.