येत्या १९ ऑक्टोबरपासून भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे सिरीज सुरु होणार आहे. यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. ३ वनडे सामन्यांच्या सिरीजनंतर ५ टी-२० सामन्यांची सिरीजही खेळवली जाणार आहे. यासाठी नुकतंच टीम इंडियाची घोषणा झाली आणि रोहित शर्माच्या सर्व चाहत्यांचा हिरमोड झाला. याचं कारण म्हणजे रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून काढून टाकण्यात आलं.
टेस्ट क्रिकेटनंतर आता वनडे इंटरनॅशनल फॉर्मेटमध्ये देखील कर्णधारपदाची धुरा ही शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. टीमची घोषणा होण्यापूर्वीच गिलला कर्णधार केल्याची चर्चा रंगली होती. अखेरीस त्यावर शिक्कामोर्तब झालंच. अशातच आता नवा कर्णधार कोण असावा याबाबत रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.
यंदाच्या वर्षीच्या सुरुवातीला झालेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीज दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये रोहित शर्माने स्वतःला एका सामन्यातून बाहेर बसवलं होतं. त्यावेळी येणाऱ्या काळात बुमराहशिवाय कोणता खेळाडू टेस्टचा कॅप्टन बनेल असा प्रश्न माजी खेळाडू इरफान पठाणने हिटमॅनला केला होता.
इरफानच्या या प्रश्नाला उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला होता की, आताच सांगणं फार कठीण आहे. कारण अनेक तरूण खेळाडू आहेत. मला असं वाटतं की, या तरूण मुलांनी पहिल्यांना क्रिकेटचं महत्त्व समजलं पाहिजे. या फॉर्मेटचं आणि फॉर्मेटमध्ये खेळण्याचं महत्त्व त्यांनी समजून घेतलं पाहिजे.
रोहित पुढे म्हणाला, ही मुलं फार नवीन आहेत. मला माहितीये की, नव्या मुलांवर जबाबदारी दिली पाहिजे, पण त्यांना अजून खेळूदेत. त्यांनी पुढची अजून काही वर्ष हार्ड क्रिकेट खेळावं. मुळात मी काय, बुमराह किंवा कोहली आम्ही सर्वांनी हे कर्णधारपद कमावलं होतं. कोणालाही थाळीत सजवून कॅप्टन्सी दिली गेलेली नाही. त्यामुळे असं आयतं कर्णधारपद कोणालाही मिळू नये, नव्या खेळाडूंनी ही गोष्ट कमावली पाहिजे.
नव्या खेळाडूंमध्ये खूप चांगलं टॅलेंट आहे. पण मला असं वाटतं की, टीम इंडियाचं कर्णधारपद भूषवणं ही साधी किंवा सोपी गोष्ट नाही. भारताचा कॅप्टन बनणं हा एक खूप मोठा सन्मान आहे. आपला इतिहास आणि इतर गोष्टी पाहता कर्णधारपद ही खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना ती गोष्ट स्वतः कमावूदेत, असंही रोहित शर्मा म्हणाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.