Hardik Pandya fitness news : प्लेऑफमध्ये पोहचण्याची धुसूर आशा जिवंत असणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या गोटातून सध्या एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव पुढील सामन्यात खेळण्याची शक्यता नाही. आयपीएल २०२६ च्या निर्णायक टप्प्यात असतानाच कर्णधार हार्दिक पांड्या आणि स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हे दोघेही आरसीबीविरोधात होणाऱ्या पुढील सामन्यातून बाहेर राहण्याची शक्यता आहे.
१० मे रोजी रायपूरच्या मैदानात आरसीबी आणि मुंबई यांच्यात लढत होणार आहे. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी मुंबईला हा सामना जिंकावाच लागणार आहे. तर दुसरीकडे आरसीबीला गुणतालिकेत पहिल्या २ मध्ये राहण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत. मुंबई आणि आरसीबी यांच्यातील लढत रोमांचक होण्याची शक्यता आहे. पण या महत्त्वाच्या सामन्यात हार्दिक पांड्या आणि सूर्या हे अनुभवी खेळाडूच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहेत.
हार्दिक पांड्या 'बॅक स्पॅझम'मुळे त्रस्त
हार्दिक पांड्याला मागील काही दिवसांपासून पाठदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळेच पांड्या लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्याला मुकला होता. आता आलेल्या ताज्या अपडेटनुसार, मुंबई इंडियन्सचा संघ रायपूरला रवाना झाला आहे. पण संघासोबत हार्दिक विमानाने प्रवास करताना दिसला नाही. त्यामुळे तो आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे सांगितले जात आहे. हार्दिक पांड्या आरसीबीविरोधात खेळणार नसल्याचे रिपोर्ट्स आले आहेत.
सूर्यकुमार यादव का खेळणार नाही?
सूर्याने हार्दिकच्या अनुपस्थितीत गेल्या सामन्यात नेतृत्व केले होते. पण तो आगामी आरसीबीविरोधातील सामन्यातून बाहेर पडू शकतो. सूर्याला दुखापत झालेली नाही. पण कौटुंबिक कारणामुळे सूर्याची खेळण्याची शक्यता नाही. रिपोर्टनुसार, सूर्याची पत्नी देविशा त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे, त्यामुळे तो या महत्त्वाच्या वेळी कुटुंबासोबत राहण्यासाठी रजा घेत आहे. त्यामुळे पुढील काही सामन्यासाठी सूर्या उपलब्ध नसेल.
हार्दिक पांड्या आणि सूर्या दोघेही नसतील, तर मुंबई संघ कोणाच्या नेतृत्वाखाली खेळणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. जसप्रीत बुमराह किंवा पुन्हा एकदा रोहित शर्मा यांच्याकडे जबाबदारी सोपवली जाऊ शकते. चाहत्यांची इच्छा असली तरी, संघ व्यवस्थापन पुन्हा रोहितकडे जबाबदारी सोपवते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत ९ व्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना उरलेले चारही सामने जिंकणे अनिवार्य आहे. अशा वेळी या दोन स्टार खेळाडूंची अनुपस्थिती संघाला नक्कीच महागात पडू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.