Mohammed Siraj On IPL 2023 : भारतीय प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल २०२३ स्पर्धेवर फिक्सिंगचं सावट असल्याची बाब समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजशी संबंधित हे प्रकरण आहे. रिपोर्टनुसार, एका ड्रायव्हरने फोनद्वारे सिराजशी संपर्क साधला होता आणि RCB शी संबंधित माहिती देण्यास सांगितले.
सिराजने याबाबत बीसीसीआयच्या (BCCI) अॅण्टी करप्शन युनिट (ACU) ला माहिती दिली आहे. भ्रष्टाचारासंबंधी बीसीसीआयने एक आचारसंहिता तयार केली आहे. जर कोणताही खेळाडू (Cricket Player) किंवा अधिकारी कुणाही सट्टेबाजाने संपर्क साधल्यास बीसीसीआयला माहिती देत नसेल तर, त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाते. (Latest Sports News)
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, मागील सामन्यात सट्टा खेळताना खूप पैसा गमावल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने (ड्रायव्हर) सिराजला फोन करून संघाच्या अंतर्गत घडामोडींची माहिती मागितली. सिराजने ही बाब तात्काळ बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे कळवली. फोन करणारी व्यक्ती हैदराबाद येथे चालक म्हणून काम करते.
आयपीएल सामन्यांवर तो सट्टा खेळतो अशी माहिती समोर आली आहे. त्याने वारेमाप पैसा सट्ट्यावर गमावला आहे. त्यामुळे त्याने सिराजशी संपर्क साधून संघाची अंतर्गत माहिती मिळावी असे सांगितल्याचे समोर आले आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, सिराजने या प्रकरणाची माहिती तात्काळ बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेला दिली. अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेतले. त्याची चौकशी करण्यात येत आहे.
आयपीएलवर फिक्सिंगचं सावट असल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचा प्रकार घडला आहे. काही खेळाडूंवर फिक्सिंग प्रकरणात कारवाईही करण्यात आली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.