२ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वेस्टइंडिज विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या १५ सदस्यीय संघाची कमान स्टार फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे, तर उपकर्णधारपदी रवींद्र जडेजाची नियुक्ती करण्यात आली आहे. दुखापतीमुळे ऋषभ पंत संघाचा भाग होऊ शकला नाही, त्याऐवजी रवींद्र जडेजाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. वेस्टइंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी अनेक प्रमुख खेळाडूंच्या नावाची चर्चा होती, परंतु या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलेले नसून एका खेळाडूने मालिका खेळण्यास नकार दिला.
करुण नायर
इंग्लंड दौऱ्यावर आठ वर्षांनी टीम इंडियामध्ये परतलेल्या करुण नायरलाही वेस्ट इंडिज मालिकेतून वगळण्यात आले. कत्याने चार सामन्यांमध्ये २५.७ च्या सरासरीने फक्त २०५ धावा केल्या. यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश होता.
अभिमन्यू ईश्वरन
अभिमन्यू ईश्वरनला संपूर्ण इंग्लंड दौऱ्यावर बेंचवर बसवण्यात आले. त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आता वेस्ट इंडिज मालिकेसाठी अभिमन्यूला संघात स्तान देण्यात आलेले नाही. ईश्वरनने १०४ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ७,८८५ धावा केल्या आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे.
आकाशदीप
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेगवान गोलंदाज आकाशदीपला संघात स्थान देण्यात आले नाही. इंग्लंड दौऱ्यात आकाशदीपने चांगली कामगिरी केली होती, तीन सामन्यांमध्ये त्याने १३ विकेट घेतले होते. तरीही त्याला संघातून वगळण्यात आले.
मोहम्मद शमी
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून त्याला कसोटी संघात सातत्याने दुर्लक्षित केले जात आहे. शमीने ६४ कसोटी सामन्यांमध्ये २२९ विकेट्स घेतले आहेत.
शार्दुल ठाकूर
अनुभवी अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरलाही वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. इंग्लंड दौऱ्यात ठाकूर भारतीय संघाचा भाग होता. त्याने २७ षटकांमध्ये २ विकेट्स घेतल्या.
श्रेयस अय्यर
श्रेयस अय्यरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिका खेळण्यास नकार दिला. श्रेयसची संघात निवड होणार होती, परंतु फिटनेसचे कारण देत त्याने रेड-बॉल क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी सांगितले की, जर अय्यर फिट असता तर तो वेस्ट इंडिज मालिकेत खेळला असता.