ओव्हल कसोटीच्या पहिल्याच दिवशी वाद उफाळला
पंचांच्या एका कृतीनं वादाची ठिणगी पडली
इंग्लंडला मदत केल्याचा पंचांवर आरोप
मैदानात नेमकं काय घडलं?
भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये मालिकेतील अखेरचा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानात होत आहे. या कसोटी सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. खेळाडूंमध्ये स्लेजिंग, टोमणे-टोलेबाजीचा जोरदार सामना रंगेल असं वाटत असताना, पहिल्या दिवशीच वादाची ठिणगी पडली आहे. पण ही ठिणगी कुणा एका खेळाडूमुळं नाही, तर पंचांमुळं नवा वाद उफाळून आला आहे.
भारत आणि इंग्लंड मालिकेत आतापर्यंत बरेच वाद झालेत. आता अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी नव्या वादाला तोंड फुटले आहे. ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच पंच (अंपायर) कुमार धर्मसेनाच्या एका निर्णयावरून वाद झाला आहे. इंग्लंडची मदत केल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे.
पंच कुमार धर्मसेना याच्या शिरावर इंग्लंडला मदत केल्याचा याआधीही एक आरोप झाला आहे. धर्मशालामध्ये हा वाद झाला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती ओव्हलच्या मैदानात झाली आहे. त्याच्यावर इंग्लंडला मदत केल्याचा आरोप होत आहे. पहिल्या सत्रात जॉश टंगने फेकलेल्या एका चेंडूवर भारतीय फलंदाज साई सुदर्शनविरोधात पायचीत (एलबीडब्ल्यू) अपील झाली. धर्मसेना यानं नाबाद दिलं. पण हा निर्णय देताना त्यानं अशी काय कृती केली की त्यावरून वाद झाला.
भारताच्या पहिल्या डावाच्या १३ व्या षटकात जॉश टंगनं एक फुलटॉस चेंडू फेकला. त्यावर साई सुदर्शनविरोधात एलबीडब्ल्यूची अपील केली. सुदर्शन हा चेंडू खेळून काढताना पडला. इंग्लंडच्या खेळाडूंनी अपील केली. त्यावेळी पंच कुमार धर्मसेनाने एक इशारा केला. त्यावरून वाद झाला. धर्मसेनाने नाबाद देताना सुदर्शनच्या पॅड्सवर चेंडू लागण्याआधी बॅटवर चेंडू लागला आहे असा इशारा केला. त्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी डीआरएस घेतला नाही.
धर्मसेनानं केलेल्या खुणेनंतर त्याच्यावर इंग्लंडला मदत केल्याचा आरोप होत आहे. सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू आहे. चेंडू बॅटला लागलेला आहे असं इंग्लंडच्या खेळाडूंना सांगण्याची गरजच काय? क्रिकेटमध्ये डीआरएसची सुविधा आहे, ते डीआरएस घेऊ शकले असते, असा प्रश्न सोशल मीडियावरून विचारला जात आहे. धर्मसेनाने बॅटला चेंडू लागल्याचे सांगितले नसते तर इंग्लंडच्या खेळाडूंनी रिव्ह्यू घेतला असता आणि त्यांचा एक रिव्ह्यू वाया गेला असता. त्यामुळे भारतीय संघाला त्याचा फायदा होऊ शकला असता, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.