आशिया कप २०२५ फायनलचा सामना रविवारी होणार आहे. बलाढ्य भारत आणि तुलनेनं कमकुवत असलेल्या पाकिस्तान यांच्यात ही लढत होतेय. आतापर्यंत भारतीय संघ अपराजित राहिला आहे. फायनलमध्ये भिडणाऱ्या पाकिस्तानलाच भारतानं दोनदा तुडवलं आहे. १४ सप्टेंबरला भारतानं पाकिस्तानला ७ विकेट राखून मात दिली. त्यानंतर सुपर फोरमध्येही भारतानं सहा गडी राखून विजयश्री मिळवली. आता तिसऱ्यांदा भारत-पाकिस्तान महामुकाबला होत आहे. जो संघ जिंकणार तो आशियातील चॅम्पियन होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरतील. पण टीम इंडियासमोर पाच आव्हानं आहेत. ती पार करावी लागतील. झालेल्या चुकांमधून सुधारणा कराव्या लागतील. अन्यथा पाकिस्तानविरुद्धच्या फायनलमध्ये त्या चुका महागात पडतील.
आशिया कप स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमध्ये जसप्रीत बुमराहनं चांगली गोलंदाजी केली. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या लढतीतही बुमराहनं दोन विकेट घेतल्या. पण २२ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात बुमराहचा फॉर्म हरवला होता. ४ ओव्हरला ४५ धावा दिल्या. विकेट सुद्धा मिळाली नाही. पण बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तो पुन्हा लयीत आला. फायनल, ती सुद्धा पाकिस्तानविरुद्ध असल्यानं बुमराहचं फॉर्ममध्ये येणं तितकंच महत्वाचं आहे. बुमराहला श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यात विश्रांती दिली होती. आता पाकिस्तानविरुद्ध त्याची भूमिका महत्वाची आहे.
आशिया कपमध्ये क्षेत्ररक्षण ही भारताची सगळ्यात कमकुवत बाजू राहिली आहे. आतापर्यंत संघातील खेळाडूंनी १२ झेल सोडले आहेत. आशिया कप खेळणाऱ्या इतर संघांपेक्षा हा आकडा जास्त आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंनी आतापर्यंत फक्त तीन झेल सोडले आहेत. याचाच अर्थ क्षेत्ररक्षण ही पाकिस्तानची जमेची बाजू आहे. भारतीय संघाला ही एक उणीव भरून काढावी लागेल. कारण फायनलमध्ये केलेली एक चूक महागात पडू शकते.
पाकिस्तानच्या विरुद्ध पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने ४७ धावांची नाबाद खेळी केली होती. पण त्यानंतर सूर्यकुमार यादवची बॅट जणू त्याच्यावरच रुसून बसली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तर खातंही उघडता आलं नव्हतं. बांगलादेशविरुद्ध सूर्यकुमार केवळ पाच धावा करून बाद झाला होता. श्रीलंकेविरुद्ध तर फक्त १२ धावा करता आल्या. फायनलमध्ये सलामीच्या जोडीनं खास काही केलं नाही तर, सूर्यकुमारची जबाबदारी वाढणार आहे. खराब फॉर्मात असेलला सूर्या जर अपयशी ठरला तर, संघाला महागात पडू शकतं.
भारतानं आतापर्यंत सगळे सामने जिंकले असले तरी, मधल्या फळीतील खेळाडूंचा खराब फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या दोघांच्या कामगिरीमुळं मधल्या फळीतील कमतरता भरून काढलेली आहे. अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्याची फलंदाजी हा चिंतेचा विषय आहे. शिवम दुबे सुद्धा काही खास करू शकला नाही. भारताची पहिली फळी जर कोलमडली तर, या खेळाडूंना चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.
भारताची फलंदाजी आतापर्यंत अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्या दोघांवरच अवलंबून राहिलेली आहे. दोघांनीही संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. अभिषेक शर्मानं प्रत्येक सामन्यात भारताला वेगवान सुरुवात करून दिली आहे. पण फायनलसारख्या सामन्यात या दोघांवरच अवलंबून राहणं जोखमीचं ठरू शकतं. मधल्या फळीसह अन्य फलंदाजांनाही ही जबाबदारी घ्यायला हवी. सुरुवातीचे फलंदाज बाद झाले तर संघावर अतिरिक्त दबाव येईल. त्याचा परिणाम निकालावर होऊ शकतो.
१९८५ - बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप - मेलबर्न - भारताला ८ विकेट्सनं विजय
१९८६ - ऑस्ट्रल-आशिया कप, शारजाह, पाकिस्तानचा एक गडी राखून विजय
१९९४ - ऑस्ट्रल-आशिया कप, शारजाह, पाकिस्तानचा ३९ धावांनी विजय
२००७ - टी २० वर्ल्डकप, जोहान्सबर्ग, भारतानं ५ धावांनी सामना जिंकला
२०१७ - चॅम्पियन्स ट्रॉफी, ओव्हल, पाकिस्तानचा १८० धावांनी विजय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.