ICC म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुरुषांच्या आंतराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील नियमांमध्ये नुकतेच काही महत्त्वाचे बदल मंजूर केले आहेत. यातील ठराविक नियम २०२५-२७ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत लागू करण्यात आले आहेत. उर्वरित नियम २ जुलै २०२५ पासून कसोटी क्रिकेट फॉरमॅटमध्ये अंमलात आणले जातील. विशेष म्हणजे याच दिवशी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला सुरुवात होणार आहे.
१. कसोटी सामन्यांमध्येही स्टॉप क्लॉक लागू होणार.
टी-२० आणि वनडे फॉरमॅटप्रमाणे आयसीसीने कसोटीमध्ये स्टॉप क्लॉक नियम लागू केला जाणार आहे. स्लो ओव्हर रेट रोखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. एक ओव्हर संपल्यानंतर एक मिनिटांच्या आत पुढील ओव्हर सुरु करणे अनिवार्य राहणार आहे. हा नियम न पाळल्यास अंपायर्स दोन वेळा इशारा देतील आणि तिसऱ्यांदा पाच धावांची पेनल्टी लागेल.
२. लाळेचा जाणीवपूर्वक वापर केल्यास चेंडू बदलणे बंधनकारक नाही.
करोना काळात लागू करण्यात आलेला लाळ वापरण्यावरचा बंदी आदेश कायम राहणार आहे. मात्र, आता चेंडूवर लाळ लावल्यास थेट चेंडू बदलावा लागेल, असा नियम रद्द करण्यात आला आहे. काही संघ मुद्दामून लाळ वापरुन चेंडू बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आल्याने हा बदल करण्यात आला आहे.
३. डीआरएस प्रोटोकॉलमध्ये मोठा बदल
डीआरएस संदर्भातील नवा नियम महत्त्वाचा ठरणार आहे. पूर्वी कॅच नॉट-आउट ठरवण्यात आल्यास एलबीडब्लूचा पर्याय उपलब्ध नव्हता. आता कॅचआउट नसल्यास टीव्ही अंपायर बॉल ट्रॅकिंच्या मदतीने फलंदाज एलबीडब्लू आहे की नाही हे तपासू शकतात.
४. खोट्या कॅचच्या दाव्यावर नो-बॉल
जर कॅच अस्पष्ट असेल आणि खेळाडू मुद्दा आउटचा दावा करेल, तर तेव्हा नो-बॉल ठरेल. त्यामुळे सर्व खेळाडूंनी प्रामाणिकपणे अपील करणे आवश्यक असेल.
५. शॉर्ट रन पकडल्यास ५ धावांचा दंड
फलंदाज धाव घेताना शॉर्ट रन घेतल्याचे पकडले गेल्यास अंपायर्स थेट क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ५ धावांचा बोनस देतील. तसेच पुढील चेंडूसाठी कोणता फलंदाज स्ट्राईकवर असायला हवा हे अंपायर फिल्डिंग करणाऱ्या कर्णधाराला विचारतील.
एकूणच, आयसीसीच्या या नव्या नियमांमुळे कसोटी क्रिकेटमध्ये अधिक शिस्त, वेग आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न दिसून येतो. भारत-इंग्लंड सामन्यापासूनच या नियमांची अंमलबजावणी होत असल्याने चाहत्यांचे आणि खेळाडूंचे लक्ष याकडे लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.