अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा ६ विकेट्सनी पराभव केला. या पराभवामुळे भारताचं आयसीसी वर्ल्डकप स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न भंगल आहे. संपूर्ण स्पर्धेत भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी वर्चस्व राखलं होतं. पण अंतिम फेरीत दोन्ही विभागांमध्ये भारताची कामगिरी निराशाजक राहिली.
त्यामुळे टीम इंडियाचं नेमकं चुकलं तरी, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. दरम्यान टीम इंडियाच्या पराभवावर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी पराभवाला दोन खेळाडूंना जबाबदार धरलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
टीम इंडियाच्या (Team India) मध्यल्या फळीतील फलंदाजांनी जास्त डॉट बॉल खेळले. त्यांनी एकेरी आणि दुहेरी धावांवर भर दिला नाही, असं गावस्कर म्हणाले. रोहित शर्माने नेहमीप्रमाणे भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. पण तो बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी खूपच डॉट बॉल खेळले.
त्यांनी स्कोअरबोर्ड हलता ठेवला नाही. भागीदारी रचताना ऑस्ट्रेलियाच्या पार्ट टाईम गोलंदाजांना लक्ष्य केलं नाही, असं गावस्कर म्हणाले. विराट आणि राहुलने मीडल ओव्हरमध्ये चौकार लगावले नाहीत. त्यांनी किमान जास्तीत जास्त एकेरी धावा केल्या असत्या, तरीही भारताला २७० धावांचं लक्ष्य देता आलं असतं, असं म्हणत गावस्कर यांनी दोघांच्या फलंदाजींवर नाराजी व्यक्त केली.
दुसरीकडे टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं देखील हाच मुद्दा मांडला. 'कोहली आणि राहुलनं २५० धावांचं लक्ष्य डोक्यात ठेवून फारच संथ खेळ केला. त्यांनी भागिदारी रचताना अधिक एकेरी धावा काढायला हव्या होत्या, असं सेहवाग म्हणाला.
टीम इंडियाने एकेरी आणि दुहेरी धावांवर जास्त भर दिला असता, तरी गोलंदाजांना लढता येईल, अशी धावसंख्या उभारता आली असती, असंही सेहवागने म्हटलं आहे. सेहवागने लोकेश राहुलच्या फलंदाजीवर नाराजी व्यक्त केली आहे.
राहुलने या सामन्यात भारताकडून सर्वाधिक ६६ धावा केल्या. पण त्यासाठी त्यानं १०७ चेंडू घेतले. त्याने केवळ एकच चौकार मारला. याशिवाय ११ ते ४० षटकांमध्ये भारतीय फलंदाजांना केवळ २ चौकार मारता आले. ही कामगिरी खूपच निराशाजनक आहे, असं म्हणत सेहवागने आपली नाराजी व्यक्त केली
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.