मुंबई क्रिकेट असोसिएशनने सोमवारी बांद्रा-कुर्ल्यातील शरद पवार इनडोअर क्रिकेट अकादमी आणि मनोरंजन केंद्रात मुंबईच्या महिला कर्णधारांच्या फोटोंनी सजवलेली खास भिंत साकारून त्यांच्या क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव केला.
या उपक्रमातून मुंबईच्या महिला क्रिकेटमधील अग्रणी खेळाडूंना सन्मान तर मिळालाच, पण पुढील पिढीला प्रेरणाही मिळावी, हा हेतूही व्यक्त करण्यात आला. याचं उद्घाटन एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, एपेक्स काऊंसिलचे सदस्य तसंच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत महिला खेळाडूंच्या उपस्थितीत करण्यात आलं.
आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ च्या ट्रॉफी मुंबईतील आगमनाने या कार्यक्रमाचं औचित्य अजूनच वाढलं. डीपी वर्ल्डच्या सहकार्याने सुरु असलेल्या या ट्रॉफी टूरदरम्यान एमसीएने वर्ल्डकपचं स्वागत केलं. यावेळी मुंबईच्या समृद्ध क्रिकेट परंपरेचा आणि शहरातील खेळावरील प्रेमाचा उत्सव साजरा करण्यात आला.
भारतीय महिला क्रिकेटमध्ये मुंबई नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे. भारताने १९७८ साली महिला वर्ल्डकपमध्ये मुंबईकर डायना एडलजी यांचा टीममध्ये समावेश होता. तर आता ही परंपरा पुढे चालवत जेमिमा रॉड्रिग्स आगामी १३व्या वर्ल्डकपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. यावेळी सायली सातघरेही राखीव यादीत स्थान मिळवून आहेत.
या वेळी अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले, “भारतीय महिला क्रिकेटसाठी मुंबई ही कायमच महत्त्वाची आहे. डायना एडलजींनी पहिल्या वर्ल्डकपचं संघाचं नेतृत्व केलं. तर आज जेमिमा रॉड्रिग्ससारखे खेळाडू शहराचा अभिमान वाढवतायत. वर्ल्डकपच्या आगमनामुळे हा क्षण अधिकच संस्मरणीय झाला आहे. महिलांच्या क्रिकेटला प्रत्येक स्तरावर भक्कम पाठबळ देण्याचा आमचा निर्धार आणखी दृढ झालाय.”
आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ ही स्पर्धा ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबरदरम्यान होणार असून नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम, गुवाहाटीतील एसीए स्टेडियम, इंदूरमधील होळकर स्टेडियम, विशाखापट्टणम इथल्या एसीए-व्हीडीसीए स्टेडियम आणि कोलंबो (श्रीलंका) इथल्या आर. प्रेमदासा स्टेडियम या ठिकाणी सामने खेळवले जाणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.